समाजातील विषमतेला वर्णभेद जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 06:06 AM2018-10-25T06:06:46+5:302018-10-25T06:07:00+5:30
समाजातील विषमतेला ब्राह्मण जबाबदार नाही, तर ब्राह्मणत्व जबाबदार आहे.
मुंबई : समाजातील विषमतेला ब्राह्मण जबाबदार नाही, तर ब्राह्मणत्व जबाबदार आहे. ब्राह्मणत्व ही एक वृत्ती असून ती बाळगणारे लिंगभेद, जातीभेद, वर्णव्यवस्थेला जबाबदार आहेत, असे मत कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अहवाल सादर करणाऱ्या सत्यशोधन समितीचे सदस्य भीमराव बनसोड यांनी आयोगापुढील सुनावणीत बुधवारी व्यक्त केले.
सत्यशोधन समितीने कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर कोरेगाव वढू-बुद्रूकला भेटी देऊन येथील नागरिकांशी व ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली. या चर्चेअंती त्यांनी एक अहवाल प्रसिद्ध करत या हिंसाचारास समता हिंदू आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना जबाबदार ठरविले आहे. तसेच या हिंसाचारामध्ये अनुसूचित जातीच्या लोकांचे मोठे नुकसान झाले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
या हिंसाचारासाठी उच्चभ्रूंना दोषी ठरविल्याने मिलिंद एकबोटे यांचे वकील नितीन प्रधान यांनी बनसोड यांना प्रश्न केला की, समाजातील विषमतेला ब्राह्मण जबाबदार आहेत आणि ब्राह्मणेतर समाजाचा ते बळी घेत आहेत, असे तुम्ही समजता का? त्यावर उत्तर देताना बनसोड यांनी आयोगाला सांगितले की, काही ब्राह्मण चांगले असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे सुरुवातीचे सहकारी हे ब्राह्मणच होते. त्यामुळे याचा दोष मी ब्राह्मणांना देत नाही. ब्राह्मण हे समाजातील विषमतेला जबाबदार आहेत.
त्यावर प्रधान यांनी ब्राह्मणत्व म्हणजे काय? अशी विचारणा बनसोड यांच्याकडे केली. ब्राह्मणत्व ही एक वृत्ती आहे. या वृत्तीचे लोक लिंगभेद, जातभेद, वर्णभेद करणारे आहेत आणि समाजातील विषमतेला ते लोक कारणीभूत आहेत, असे बनसोड यांनी आयोगाला सांगितले.
बनसोड यांनी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली व त्यांच्यावर लिहिलेली अनेक पुस्तके वाचली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने आपण प्रभावित झाल्याचे न्यायालयाला सांगितले.