जि. प.च्या शाळांसह शिक्षकांच्या सेवा होणार हस्तांतरित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 01:58 AM2019-07-28T01:58:06+5:302019-07-28T01:58:18+5:30
शाळा हस्तांतरित करताना शिक्षकांची सेवाही महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यातल्या वेगवेगळ्या महापालिकेच्या हद्दीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहरांचा जलद विकास करण्याच्या दृष्टीने हद्द वाढवताना जिल्हा परिषद शाळांचे महापालिकेकडे हस्तांतर करण्याची बाब राज्य सरकारच्या विचाराधीन होती. याबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यांतील तज्ज्ञांकडून सूचना मागविल्यानंतर ग्रामविकास विभागाने हस्तांतरणाला हिरवा कंदील दाखवला आहे. शाळा हस्तांतरित करताना शिक्षकांची सेवाही महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे. या वेळी कोणती कार्यवाही करण्यात यावी यासंबंधी शासन निर्णय गुरुवारी ग्राम विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
सुरुवातीला महानगरपालिका / नगरपालिका क्षेत्रवाढीमुळे हस्तांतरित होणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील एकूण रिक्त पदांचा आढावा घेण्यात यावा, महानगरपालिका / नगरपालिकांना कोणत्या माध्यमांच्या शाळेत किती शिक्षकांची आवश्यकता आहे याची संख्या निश्चिती करावी आणि त्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे रिक्त पदांवर कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. या पदांवर शिक्षक दिनाच्या सेवा हस्तांतरित कारण्यासाठी प्रत्येक पदाच्या संवर्गानुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांकडून विकल्प घेणे आवश्यक असणार आहे. या शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात यावी, असेही जारी केलेल्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
पुढील एक वर्ष बदलीतून मिळणार सूट
ज्या शिक्षकांच्या सेवा हस्तांतरित होणार आहेत, त्यांना पुढील एक वर्ष बदलीतून सूट मिळणार असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षक धोरण त्यांना लागू असणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबतची सर्व कारवाई पार पाडणे अपेक्षित आहे.