मुंबई : मुंबई ते दिल्ली हे अंतर लवकरच अवघ्या १२ तासांत कापणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेने मुंबई-दिल्ली मार्गावरील रेल्वे रुळांची क्षमता १६० किमी प्रतितास करण्यासाठी काही कामांच्या निविदा काढल्या आहेत. तर, काही कामांना सुरुवात देखील करण्यात आली आहे. हा प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण होणार असून या प्रकल्पासाठी ११,१८८.९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर रुळांची क्षमता १६० किमी प्रतितास करण्यासाठी पश्चिम रेल्वेने अंतिम आराखडा तयार केला होता. रेल्वे मंडळाने या आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर या प्रकल्पांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. बांधकामासाठी ७४५०.४, सिग्नल आणि दूरसंचारसाठी ९३४.७, विद्युत कामासाठी २५२३.२, तांत्रिक कामासाठी २८०.७ कोटी रुपये असे एकूण या प्रकल्पासाठी ११,१८८.९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
---------
मुंबई-दिल्ली मार्गातील वेळ जास्तीत जास्त कमी व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रेल्वे मार्गासाठी काही निविदा काढण्यात आल्या आहेत तर काही विभागांचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मार्च २०२४ ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
-----
मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग
रेल्वे विभाग -मार्ग- समावेश
पश्चिम - मुंबई ते नागदा - ६९३.७४ किमी - ५०.३० टक्के
पश्चिम मध्य - नागदा-मथुरा - ५४५.८० किमी - ३९.५८ टक्के
उत्तर मध्य - मथुरा ते पालवाल - ८२.४० किमी - ५.९७ टक्के
उत्तरेतर - पालवाल ते नवी दिल्ली - ५७.२० - ४.१५
एकूण - मुंबई-दिल्ली - १३७९.१४ किमी - १०० टक्के