कोकणात शहरापासून रेल्वे स्थानके लांबच
By admin | Published: June 16, 2014 12:46 AM2014-06-16T00:46:02+5:302014-06-16T00:46:02+5:30
कोकणच्या डोंगरदऱ्यात रेल्वे गाडी धावणार हे कोकणवासीयांचे स्वप्न कोकण रेल्वेने पूर्ण केले. मात्र गाव आणि शहरापासून कोसो दूर अंतरावर रेल्वे स्थानक उभारण्यात आले आहे
दासगांव : कोकणच्या डोंगरदऱ्यात रेल्वे गाडी धावणार हे कोकणवासीयांचे स्वप्न कोकण रेल्वेने पूर्ण केले. मात्र गाव आणि शहरापासून कोसो दूर अंतरावर रेल्वे स्थानक उभारण्यात आले आहे. कोकणातील इतर रेल्वे स्थानकाप्रमाणे महाड तालुक्यातील रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके लोकवस्तीपासून दूर आहेत. यामुळे महाडवासीयांना रेल्वेचा काडीचाही फायदा मिळत नाही.
रोह्यापासून सिंधुदुर्गापर्यंत कोकण रेल्वेची हद्द असून पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली या व्यतिरिक्त कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे नसल्याने कोकणच्या विकासात खीळ बसली आहे. प्रामुख्याने महाड शहराला व महाड औद्योगिक वसाहतीला त्याचा फटका बसला आहे. महाड शहराच्या बाहेरुन गेलेली कोकण रेल्वेला वीर, वामणे, सापे, करंजाडी, विन्हेरा ही स्थानके आहेत. मंजूर चार स्थानकापैकी वीर आणि करंजाडी या दोन स्थानकांची उभारणी कोकण रेल्वेने प्रारंभी काळातच केली. मात्र वामणे, सापे हे स्थानक मंजूर असून देखील ग्रामस्थांनी श्रमदानातून या स्थानकाची उभारणी केली. आजही हे स्थानक प्राथमिक सुविधापासून वंचित आहे. तर विन्हेरे स्थानकासाठी येथील ग्रामस्थांनी संघर्ष समिती स्थापन करुन लढा दिला होता. त्यानंतर या स्थानकाची उभारणी करण्यात आली.
या चार स्थानकांमध्ये अत्यंत महत्वाचे हे वीर रेल्वे स्थानक समजले जाते. कारण हे मुंबई - गोवा महामार्गालगत असून शहरापासून जवळच स्थानक आहे. महाड शहरामध्ये बँका, शिक्षण संस्था, औद्योगिक कारखान्यांची कार्यालये, शिक्षण संस्था, बांधकाम व्यवसाय व अन्य व्यवसायाचे जाळे विणलेले आहे. तसेच महाड औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये स्थानिकांबरोबरच बाहेरील कामगार, अधिकारी वर्ग, मजूर यांचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता फार मोठ्या प्रमाणावर महाड शहरातून व महाड शहरात प्रवाशांची जा ये होत असते.
मात्र एक ते दोन पॅसेंजर गाड्या वगळता लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे मुळीच थांबा नाही. त्यामुळे येथील प्रवाशी वर्गाला अन्य साधनांचा वापर करुन प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, पैसा, श्रम याची फार मोठी झळ बसते. (वार्ताहर)