‘राहिले दूर घर माझे’चा नाट्यप्रवास उलगडला
By admin | Published: September 11, 2015 01:53 AM2015-09-11T01:53:55+5:302015-09-11T01:53:55+5:30
नाट्यलेखक शफाअत खान यांचे भारताच्या फाळणीवर आधारित ‘राहिले दूर घर माझे’ नाटक मुंबई विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे.
मुंबई : नाट्यलेखक शफाअत खान यांचे भारताच्या फाळणीवर आधारित ‘राहिले दूर घर माझे’ नाटक मुंबई विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. यानिमित्ताने शफाअत खान यांच्याशी रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुक्त संवाद साधला.
हिंदी लेखक असगर वजाहत यांनी हिंदीमध्ये लिहिलेल्या या नाटकाचा मराठीत अनुवाद करण्यास सांगितले. पण तेव्हा मी नकार दिल्याचे खान यांनी या वेळी स्पष्ट केले. मात्र संहिता वाचल्यानंतर या नाटकाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अनुवाद करण्याचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले. या नाटकात फाळणीनंतर लाहोरमध्ये एकच हिंदू स्त्री राहते. त्या स्त्रीचा तेथील मुस्लीम व्यवस्थेसोबत जुळविण्याचा संघर्ष नाटकात मांडण्यात आला आहे. नाटक लिहिताना प्रेक्षकवर्गाची स्वीकारण्याची वृत्ती समजून त्यानुसार संहितेत बदल करावे लागतात. म्हणूनच नाटकाचा शेवट बदलण्यात आला, असेही खान यांनी स्पष्ट केले.
वजाहत यांची नाराजी!
नाटकाचा शेवट बदलल्याने वजाहत काहीसे नाराज झाल्याची आठवण खान यांनी सांगितली. पण त्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहिल्यावर त्यांनी कौतुक केले, अशी आठवण सांगत सामाजिक प्रश्न नाटकातून मांडताना प्रेक्षकांच्या मनाचा विचार करावा लागतो, असे खान म्हणाले, कारण त्यातून प्रबोधनाचे विचार प्रेक्षकांच्या मनात रुजतात असे त्यांनी म्हटले.