रेल्वे प्रशासनाकडून मराठी भाषेचे वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 02:49 AM2019-12-26T02:49:48+5:302019-12-26T02:49:56+5:30

व्याकरणाच्या चुका : समाज माध्यमावर काढले मध्य रेल्वेचे वाभाडे

Distinguish Marathi language from Railway Administration | रेल्वे प्रशासनाकडून मराठी भाषेचे वाभाडे

रेल्वे प्रशासनाकडून मराठी भाषेचे वाभाडे

Next

कुलदीप घायवट 

मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून मराठी भाषेविषयीचे अज्ञान दिसून येत आहे. सूचना फलकावरील चुका, मराठी भाषेच्या व्याकरणातील चुका मध्य रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केल्या जात असल्याचे दिसून येते. या सर्व चुकांच्या अनुषंगाने समाज माध्यमावरील मराठी भाषिकांनी मध्य रेल्वेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

महाराष्ट्राची राज्यभाषा असलेली मराठी भाषा मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला येत नसल्याचे दिसून येते. मराठी भाषेत स्थानकाची नावे तिकीट आणि मासिक तिकिटावर चुकीच्या पद्धतीने लिहिली जातात. उद्घोषणा करताना चुकीच्या पद्धतीने स्थानकाचे नाव उच्चारले जाते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून मराठी भाषेला फक्त गृहीत धरले जाते, अशी चर्चा समाज माध्यमात होत आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात नुकतेच एका सूचना फलकावर ‘१२३३५ क्रमांकाची गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर १९.१८ वाजता येड्यांची अपेक्षित आहे,’ असे दर्शविण्यात आले होते. समाज माध्यमावरून या सूचना फलकाचे फोटो मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. मध्य रेल्वेने याबाबत दखल घेऊन सूचना फलकावरील चूक सुधारली; आणि त्यानंतर ‘येड्यांची’ऐवजी ‘येण्याची’ असे दर्शविण्यात आले. वास्तविक, ‘गाडी येण्याची अपेक्षित आहे,’ असे म्हणण्यापेक्षा ‘गाडी येणे अपेक्षित आहे,’ असे तेथे म्हणावयास हवे.
पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांची मराठीतील नावे अयोग्य पद्धतीने उच्चारली जातात. याविरोधात अनेकदा समाज माध्यमाद्वारे ताशेरे ओढले जातात. तिकिटावर ‘भायखळा’ऐवजी ‘भायखला’, ‘टिटवाळा’ऐवजी ‘टिटवाला’ असे लिहिले जाते. ‘रिटर्न तिकीट’ न लिहिता ‘परतीचे तिकीट’ असे लिहिणे आवश्यक आहे, असे समाज माध्यमे आणि पत्रव्यवहाराद्वारे रेल्वे प्रशासनाला सांगण्यात येत आहे.

इथं मराठी हवंच!
‘गाडी थांबविण्यासाठी साखळी’ ही सेवा प्रवाशांसाठी प्रदान केली आहे. या सेवेची माहिती हिंदी, इंग्रजी आणि ब्रेल लिपीत देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी मराठी भाषेला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे या सूचना फलकाच्या वर ‘इथं मराठी हवंच!’ असे स्टिकर लावण्यात आले होते. त्यानंतर काही लोकलमध्ये या सुविधेची माहिती मराठीत लावण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाला समाज माध्यम, पत्रव्यवहार याद्वारे कायम संपर्क करतो. स्थानकांवरील सूचना, माहिती मराठीतूनच असावी. बोरीवली, मालाड, कांदिवली व इतर अनेक स्थानकांवर मराठीतून उद्घोषणा केली जात नाही. त्यावर कारण मराठी येत नसल्याचे दिले जाते. रेल्वे प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी मराठी भाषेचा वापर केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया ‘मी मराठी एकीकरण समिती’चे कार्याध्यक्ष प्रमोद मसुरकर यांनी दिली.

Web Title: Distinguish Marathi language from Railway Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.