कर्तृत्ववान पोलिसांचा आज सन्मान

By admin | Published: March 31, 2017 06:46 AM2017-03-31T06:46:50+5:302017-03-31T06:46:50+5:30

मुंबईनंतर राज्यातील सर्वात प्रमुख पोलीस आयुक्तालय म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. ९५३ चौरस मीटर क्षेत्रफळ

Distinguished police honors today | कर्तृत्ववान पोलिसांचा आज सन्मान

कर्तृत्ववान पोलिसांचा आज सन्मान

Next

नवी मुंबई : मुंबईनंतर राज्यातील सर्वात प्रमुख पोलीस आयुक्तालय म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. ९५३ चौरस मीटर क्षेत्रफळ कार्यक्षेत्रावर दोन महानगरपालिका, एक नगरपालिका, जिल्हा परिषदेचा भाग, दोन एमआयडीसी, जेएनपीटी बंदर, भविष्यात येणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, खाडीकिनारा, राज्य व राष्ट्रीय महामार्गही आयुक्तालय क्षेत्रामध्ये येतो. जेएनपीटी सारखे देशातील सर्वाधिक आयात-निर्यात होणारे बंदर या परिसरात येत असतानाही गुन्हेगारी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलिसांनी यश मिळविले आहे.
राज्यात सर्वत्र पोलिसांनी अटक केलेले आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेक ठिकाणी गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण २० ते २५ टक्के एवढेच आहे; पण नवी मुंबईमध्ये मात्र गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१६ वर्षामध्ये तब्बल ७० टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली २० पोलीस स्टेशन, गुन्हे, वाहतूक शाखा व इतर सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज्यात सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या नवी मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’ने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात प्रथमच सन्मान सोहळा आयोजित केला आहे.
निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांच्या निवड समितीने चांगल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवडक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव होणार असला तरी हा सन्मान पूर्ण पोलीस दलाचा असणार आहे. पोलिसांच्या कर्तृत्वाची माहिती नागरिकांपर्यंत जावी. पोलिसांची मेहनत व २५ लाख नागरिकांच्या रक्षणासाठी नक्की काय केले जाते, याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्पोटर््स अकॅडमी या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असणार आहेत. याशिवाय अरिहंत सुपर एन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रोनक अ‍ॅडव्हरटायझिंग, इम्पेरियल बँक्वेट, एस. के. ग्रुप, बिझायर हेही कार्यक्रमाचा भाग असणार आहेत. (प्रतिनिधी)


पनवेल, उरण, नवी मुंबईमधील २५ लाख नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी २४ तास अविश्रांत मेहनत घेत आहेत. पोलीस आयुक्तालयाने गुन्हे प्रकटीकरणामध्ये व न्यायालयात गुन्हे सिद्ध करण्यात राज्यात अग्रक्रमांक मिळवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ही कामगिरी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘लोकमत’च्या वतीने ३१ मार्चला सन्मानित करण्यात येत आहे.


वाशीमध्ये कार्यक्रम
वाशी रेल्वे स्टेशन समोरील रघुलीला मॉलच्या इम्पेरियल बँक्वेट हॉलमध्ये ३१ मार्चला सायंकाळी ६ वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक व निवड समितीचे प्रमुख रामराव वाघ यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ७०%
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आहे. २०१५ च्या तुलनेमध्ये ६०४ गुन्हे कमी झाले आहेत. गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाणही वाढले आहे. खून, दरोडा, चेन जबरी चोरी, घरफोडी, फसवणूक मोटार अपघात अशा प्रमुख १६ प्रकारांतील गुन्हे कमी करण्यात यश मिळविले आहे. राज्यात सर्वात चांगली कामगिरी नवी मुंबई पोलिसांनी करून दाखविली आहे.

राज्यातील पहिलाच कार्यक्रम
पोलीस कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अविश्रांत मेहनत घेत असतात. गणपती, नवरात्रीसह सर्व उत्सव, कार्यक्रमांमध्ये शहरवासी आनंद घेत असताना पोलीस मात्र रात्रंदिवस बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात. तापमान ४० अंशावर गेले व मुसळधार पाऊस आला तरी रोडवर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यात पोलीस व्यस्त असतात. नववर्षाचा आनंद घेण्यासाठी ३१ मार्चच्या रात्रीचा जल्लोष असो किंवा गुढीपाडव्याला नववर्षानिमित्त असणाऱ्या शोभायात्रा सर्वच ठिकाणी पोलीस डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करत असल्याने त्यांचा ‘लोकमत’च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.

अमली पदार्थ मुक्त मोहीम
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जून २०१६मध्ये अमली पदार्थ विरोधी पथक तयार केले. मागील वर्षभरामध्ये या पथकाने २९ गुन्हे दाखल करून ३७ माफियांना गजाआड केले आहे. २३ किलो गांजा, ब्राऊन शुगर, मेथॅक्युलोन, चरस असे १ कोटी १५ लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

मालमत्तेच्या गुन्ह्यांतील २०१६ची कामगिरी

चेन जबरी चोरीमध्ये जप्त माल
३३ लाख ९० हजार

जबरी चोरीमध्ये जप्त माल
१ कोटी ४ लाख

घरफोडीमध्ये जप्त माल
१ कोटी ८१ लाख
 

Web Title: Distinguished police honors today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.