Join us  

तारांच्या जंजाळांमुळे विद्रुपीकरण; मुंबईच्या सौंदर्यीकरणाला केबलच्या वायरचा फास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 11:20 AM

मुंबईचे सुशोभीकरण करण्यासाठी पालिकेकडून कोट्यवधी खर्च केले जात आहेत.

रतींद्र नाईक 

मुंबई : मुंबईचे सुशोभीकरण करण्यासाठी पालिकेकडून कोट्यवधी खर्च केले जात आहेत. रस्त्यांचे काँक्रिटिकरण, विद्युत रोषणाई, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण तसेच रंगरंगोटीची कामे युद्धपातळीवर प्रशासनाकडून केली जात आहेत. असे असले तरी इमारती व रस्त्यांवरून लटकणाऱ्या केबलच्या तारा या सौंदर्यीकरणात अडथळा आणत असून, मुंबई विद्रूप करीत आहेत.

 दरम्यान, या वायरमुळे काहीवेळेस धोकाही पोहचू शकतो. एकाबाजूला सुशोभीकरण सुरू असताना दुसऱ्या बाजूला केबलच्या वायर लटकत असल्याने शहराचा चेहरा विद्रुप होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईचा कायापालट करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने गेल्यावर्षी घेतला. शहर सौंदर्यीकरण अंतर्गत विविध कामे केली जाणार असून, या कामांसाठी १ हजार ७२९ कोटी रुपये खर्च पालिकेकडून केला जात आहे. प्रत्येक प्रभागासाठी तूर्तास ३० कोटींची तरतूद केली आहे.

१९१० पासून सर्व केबल जमिनीखाली टाकण्यास पालिकेने सुरुवात केली होती. तसे आदेश सर्व प्राधिकरणांना दिले होते. मात्र, आताचे मुंबईचे चित्र वाईट आहे. हे बदलण्याची गरज असून, पालिकेने जमिनीखाली ऑप्टिकल फायबर घालावी व त्याचा एक्सेस केबल चालकांना द्यावा त्यामुळे पालिकेला महसूलही मिळेल व लटकणाऱ्या तारांचा प्रश्नही मार्गी लागेल.    

    - पंकज जोशी, मुख्य संचालक अर्बन सेंटर मुंबई

 २०१८ मध्ये चर्नी रोड स्थानकाजवळ केबलची तार तुटून रेल्वेच्या मुख्य मार्गावर पडली होती, त्यामुळे अनेक लोकल खोळंबून वाहतूक विस्कळीत झाली होती. इतकेच नव्हे तर महालक्ष्मी पुलाजवळ केबलच्या तारा तुटून रेल्वे मार्गावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

 दक्षिण मुंबईत अनेक इमारती या ५० वर्षांपेक्षा जुन्या असून, या भागात मोठ्या प्रमाणात केबलच्या तारा पाहायला मिळतात. क्रॉफर्ड मार्केट येथील एका इमारतीला ऑगस्ट २०१९ मध्ये भीषण आग लागली होती. मात्र, केबलच्या लटकणाऱ्या तारांमुळे अग्निशमन दलाच्या गाडीला त्या ठिकाणी पोहोचता आले नाही.

स्कायलाइन बिघडतेय 

केबलच्या तारांमुळे मुंबईची स्कायलाइन बिघडत असून, लोंबकळणाऱ्या तारा त्रासदायक ठरत आहेत. या तारा जमिनीखालून टाकणे आवश्यक असतानाही इमारती, घरांवर केबलच्या तारांचे जंजाळ पाहायला मिळते. मुळात सर्व तारा या जमिनीखालून टाकणे आवश्यक असतानाही मुंबईभर तारा लटकत असल्याने शहराची शोभा जाते.