Join us

 इन्स्टंट लोनच्या जाहिरात बाजीने मेट्रोचे विद्रूपीकरण; पोस्टर चिकटवणार्‍यावर गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Published: December 20, 2023 5:56 PM

लोकल ट्रेनमध्ये वेगवेगळे बाबा, हकिम आणि वैद्यांच्या जाहिरातबाजीचे डब्बा भर लावलेले पोस्टर पाहणे नेहमीचे झाले आहे.

मुंबई: लोकल ट्रेनमध्ये वेगवेगळे बाबा, हकिम आणि वैद्यांच्या जाहिरातबाजीचे डब्बा भर लावलेले पोस्टर पाहणे नेहमीचे झाले आहे. मात्र वातानुकूलित अशा मेट्रो १ च्या ३ गाड्यांमध्येही पोस्टरबाजी सुरू करण्यात आली. त्याच्या सीटच्या मागील बाजूला इन्स्टंट लोनची जाहिरात चिटकवण्यात आल्यानंतर प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेत अंधेरी पोलिसात धाव घेतली. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार विवेक कोळी (४३) हे मेट्रो १ चे सुरक्षा गार्ड असून त्यांनी याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी अंधेरी पोलिसात तक्रार अर्ज केला होता. मेट्रोच्या ट्रेन क्रमांक १००२,१००५ आणि १०१२ मध्ये हा प्रकार उघडकीस आला. कोळी यांच्याकडे मेट्रोतील प्रवासी उतरल्यानंतर मागे काही संशयास्पद वस्तू आहे का किंवा प्रवास प्रवाशांचे सामान मागे राहिले आहे का हे तपासण्याची जबाबदारी आहे. जे काम तीन शिफ्टमध्ये केले जाते. हा प्रकार १७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता मेट्रो वर्सोवा स्थानक या ठिकाणी कोळी कर्तव्यावर असताना त्यांच्या लक्षात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मेट्रो ट्रेनमधील सेफ्टी सूचना ज्या ठिकाणी लिहिलेल्या असतात त्या ठिकाणी या जाहिरातीचे पोस्टर चिटकवण्यात आले होते. तसेच त्या पोस्टरवर गेट इन्स्टंट लोन असे नमूद करत एक मोबाईल क्रमांक देऊन त्यावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित दोन ट्रेनमध्येही हाच प्रकार उघडकीस आला. याची माहिती कोळी यांनी सुरक्षा नियंत्रण कक्षाला देत त्यानंतर अंधेरी पोलिसात येऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र मालमत्ता वीरूपणास प्रतिबंध अधिनियम कलम ३, मेट्रो रेल्वेज (संचलन आणि देखभाल) कायदा २००२ चे कलम ६२ व ७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :मुंबई