३७ हजार जणांना अन्न वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 01:38 PM2020-04-17T13:38:12+5:302020-04-17T13:38:53+5:30
उद्योगधंदे बंद आहेत त्यामुळे रोजगार नसल्याने गरिबांची उपासमार होत आहे.
मुंबई : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. उद्योगधंदे बंद आहेत त्यामुळे रोजगार नसल्याने गरिबांची उपासमार होत आहे. गरीब ,गरजूंना अन्न वाटपासाठी अम्माज किचन संस्थेने पुढाकार घेतला आहे.
याबाबत अम्माज किचन संस्थेचे संस्थापक संदीप शेट्टी म्हणाले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योगधंदे बंद झाले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या आणि रस्त्यावर राहणाऱ्या गरजूंची उपासमार होऊ नये म्हणून अम्माज किचन मार्फत गरीब अन्नाची पाकिटे वाटण्यात येत आहेत. २३ एप्रिलला म्हणजे लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी चेंबूरमधील नागरीकांसाठी तीनशे पाकिटे वाटण्यात आली. परंतु कित्येक कामगारांना ,मजुरांना पाकिटची आवश्यकता असल्याचे समोर आले त्यानंतर आणखी पाकिटे वाढविण्यात आले. आता दिवसाला दोन हजाराहून अधिक पाकिटांचे वाटप करण्यात येत असून आतापर्यंत ३७ ००० हजार पाकीट वाटण्यात आले आहे.
तर विशाल असवानी म्हणाले की, चेंबूरमधील वाशीनाका,माहुल,विष्णुनगर, चेंबूर कॅम्प आदी परिसरात अन्न पाकिटे वाटण्यात आली आहेत. समाजमाध्यमातून अनेक फोन येत आहेत त्यानुसार अन्न पाकिटे दिले जात आहेत. इतकेच नव्हे तर परदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याव्यक्तीचे वृद्ध वडील ठाणे येथील कोलशेतमध्ये राहत होते.त्यांच्याकडे जेवण तयार करण्याची सोय नव्हती. त्यांना जेवण देण्याची विनंती त्या व्यक्तीने केली. त्यानुसार ठाण्यातही त्या वृद्ध व्यक्तीला अन्न पाकीट देण्याची व्यवस्था केली असून दररोज त्यांना पाकीट दिले जात आहे.