सेंट्रलाईज पद्धतीने सोसायट्यांना कचरा पेटीचं वाटप करा; पालकमंत्र्यांचं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 09:17 PM2023-08-30T21:17:05+5:302023-08-30T21:17:38+5:30
आपला ‘स्वच्छ मुंबई,निरोगी मुंबई’ हा उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात यावा व यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींची पूर्तता आपण करावी अशा सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली.
मुंबई -भारताला सुजलाम सुफलाम करताना भारत स्वच्छ राहणे महत्त्वाचे आहे. या दिशेने प्रयत्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती दिनी ‘स्वच्छ भारत’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. रेल्वेस्थानकांपासून रस्त्यांपर्यत, शौचालयांपासून ते इस्पितळांपर्यंतचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम संपूर्ण भारतभर या अभियानातून झालं. जनसहभागातून हे अभियान क्रांतीचं रुप घेत आहे असं पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले.
मंगलप्रभात लोढा यांनी पत्रात म्हटलं की, ‘स्वच्छ मुंबई,निरोगी मुंबई’ या उपक्रमाअंतर्गत आपण सावर्जनिक शौचालय, सार्वजनिक बसस्थानके, मैदाने, उद्याने, मार्केट परिसर यांची सफाई करणे व तसेच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे क्रमप्राप्त आहे. याच अनुषंगाने पालकमंत्री सहायता कक्षामध्ये मला वेळोवेळी छोट्या स्थानिक रहिवाशी सोसायटी तर्फे ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी कचरा पेट्यांची मागणी वारंवार होत आहे. म्हणून आपण आपल्या स्तरावर सेंट्रलाईज पद्धीतीने कचरा पेट्यांचे मागणीनुसार गृहनिर्माण सोसायट्यांना वाटप करावे व त्याकरिता लागणारे सर्व सहकार्य आमच्यातर्फे आपणास मिळेल अशी ग्वाही त्यांनी पालिका आयुक्तांना दिली.
त्याचसोबत या योजनेची अजून व्याप्ती अधिक व्यापक करण्यासाठी स्वच्छता भारत अभियानांतर्गत मुंबई महापालिका क्षेत्राकरिता आपण ‘स्वच्छ मुंबई निरोगी मुंबई’ हा उपक्रम राबवावा. कारण अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरतात हे जनसामान्यांस पटवून देणे आवश्यक आहे, जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाचे महत्व अधिक अधोरेखित होईल. २ ॲाक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे, तत्पूर्वीच आपला ‘स्वच्छ मुंबई,निरोगी मुंबई’ हा उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात यावा व यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींची पूर्तता आपण करावी अशा सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली.