दक्षिण मुंबईत दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:34 AM2018-07-24T03:34:43+5:302018-07-24T03:35:01+5:30
अतिसार, गॅस्ट्रोचा धोका : पाण्याच्या १४ नमुन्यांमध्ये आढळले ‘ई कोलाय’ विषाणू
मुंबई : मुसळधार पावसामुळे जलवाहिन्यांतून दूषित पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याचा सर्वाधिक फटका दक्षिण मुंबईतील रहिवाशांना बसत आहे. विशेष म्हणजे, कॉर्पाेरेट हाउस व महत्वाची शासकीय कार्यालये असलेल्या विभागांमध्येही हा दूषित पाणी पुरवठा होत असून, पाण्याच्या १४ नमुन्यांमध्ये ‘ई कोलाय’ विषाणू आढळून आले आहेत. यामुळे अतिसार, गेस्ट्रो पसरण्याचा धोका आहे.
महापालिकेच्या जल अभियंता खात्यामार्फत संपूर्ण २४ विभागातील पाण्याचे नमुने गेल्या महिन्यात गोळा करण्यात आले होते. पावसाळ्यात जलवाहिन्यांमध्ये सांडपाणी मिसळून पाणीपुरवठा दूषित होण्याचा धोका असल्याने ही तपासणी नियमित केली जाते. मात्र, जून २०१८ मध्ये घेतलेल्या पाण्याच्या नुमन्याची प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यात ई कोलायचे प्रमाण आढळून आले आहे. यातून कुलाबा, चर्चगेट, मंत्रालय, कफ परेड असे दक्षिण मुंबईतील परिसर तर दक्षिण मध्य मुंबई परळ, दादर, माटुंगा या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण मुंबईतून ३हजार ८६ पाण्याचे नमूने महापालिकेने एकत्रित केले होते. यापैकी ५३ ठिकाणीचे नमूने पिण्यास योग्य नव्हते. तर १४ नमुन्यांमध्ये ई कोलाय आढळून आले आहे. पाण्याच्या एकूण नमुन्यापैकी दूषित पाण्याचे प्रमाण फक्त १.७२ टक्के आहे. तर ई कोलायचे प्रमाण ०.४५ टक्के एवढेच असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र ई कोलायमुळे अतिसार, गेस्ट्रो, टायफाईड यासारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
उपनगरांनाही धोका
संपूर्ण मुंबईतून ३हजार ८६ पाण्याचे नमूने महापालिकेने एकत्रित केले होते. यापैकी ५३ ठिकाणीचे नमूने पिण्यास योग्य नव्हते. तर १४ नमुन्यांमध्ये ई कोलाय आढळून आले आहे.
परळ, दादर, सायन आणि माटुंगा-१०४ ठिकाणी पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. यापैकी १०.५८ टक्के पिण्यास योग्य नसून ३.५८ टक्के पाण्याच्या नमुन्यात ई कोलाय आढळून आले आहे.
टी मुलुंड विभागातून ९७ पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी चार नमुने पिण्यास अयोग्य असून ई कोलायचे प्रमाणही सर्वाधिक चार टक्के आहे.
एम पश्चिम विभागातून ९८ पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यापैकी २.५ टक्के नमुन्यात ई कोलाय आढळून आले आहे.
त्या खालोखाल बी विभागात मोहम्मद अली रोड परिसरातून ९१ पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. त्यात १.१० टक्के पाण्यात ई कोलाय होते.