कोरोना काळात ७२ लाख जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:06 AM2021-03-23T04:06:48+5:302021-03-23T04:06:48+5:30

रा. स्व. संघाचे पाच लाख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्य लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना काळात स्वयंसेवकांनी देशभरात सेवाभारतीच्या माध्यमातून ...

Distribution of 72 lakh essential items during Corona period | कोरोना काळात ७२ लाख जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोरोना काळात ७२ लाख जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next

रा. स्व. संघाचे पाच लाख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्य

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळात स्वयंसेवकांनी देशभरात सेवाभारतीच्या माध्यमातून ९२ हजार ६५६ ठिकाणी सेवाकार्य केले. त्यासाठी ५ लाख ६० हजार कार्यकर्ते सक्रिय होते. या कार्यादरम्यान ७३ लाख जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. साडेचार कोटी लोकांना भोजन पॅकेटचे वितरण करण्यात आले, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १९ व २० मार्च या काळात बंगळुरू येथे संपन्न झाली. त्याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोढ म्हणाले की, कोरोनामुळे मार्च ते जून महिन्यापर्यंत संघाच्या शाखा बंद होत्या. जुलैपासून हळूहळू शाखा सुरू झाल्या. तत्पूर्वी, साधारण २२ मार्चपासून संघाचे कार्यकर्ते मोठ्या क्षमतेने कोरोना मदतकार्यात उतरले होते.

सेवाकार्यात ९० लाख मास्कचे वितरण, २० लाख प्रवाशांना मदत करण्यात आली. २ लाख ५० हजार भटके-विमुक्त समाजातील लोकांना मदत करण्यात आली. ६० हजार युनिट रक्तदान करण्यात आले. गेल्यावर्षी कोरोना संक्रमणाच्या प्रकोपामुळे प्रतिनिधी सभा स्थगित करण्यात आली होती. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात ३८,९१३ ठिकाणी ६२,४७७ शाखा, २०,३०१ साप्ताहिक मिलने आणि ८७३४ संघमंडळी असे संघाचे कार्य सुरू होते. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात ३४,५६९ ठिकाणी ५५,६५२ शाखा, १८,५५३ साप्ताहिक मिलने आणि ७६५५ संघमंडळी अशी संघाची संख्यात्मक कार्यस्थिती होती, असे त्यांनी सांगितले.

कोकण प्रांतात एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात ३०४ ठिकाणी ६८० शाखा, तर ४७७ ठिकाणी ७१६ साप्ताहिक मिलने अशी कार्यस्थिती होती. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात २५३ ठिकाणी ५५७ शाखा तसेच ३२७ ठिकाणी ३७५ साप्ताहिक मिलने असे संघाचे कार्य सुरू होते, असे डॉ. मोढ म्हणाले.

कोरोनामुळे शाखांच्या संख्येत घट

मागील वर्षी जगात सर्वच कार्य ठप्प झाले होते. संघही त्याला अपवाद नव्हता. त्यामुळे संघाच्या शाखांच्या संख्येत काही प्रमाणात घट दिसून आली, पण दुसरीकडे संघ कार्यकर्ते मात्र झोकून देत सेवाकार्यात जुंपले होते. आता शाखा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असून, लवकरच त्यांच्या संख्येत वाढ दिसून येईल, असे डॉ. सतीश मोढ यांनी सांगितले.

Web Title: Distribution of 72 lakh essential items during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.