सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ठेकेदारांना बोगस बिलांचे केले वितरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:24 AM2020-12-16T04:24:49+5:302020-12-16T04:24:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकीकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार जुंपली होती. मात्र, मंत्र्यांच्या बंगल्यासाठी मंजूर झालेली ९० कोटी रक्कम ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २००८ ते २०१५ सालची जुनी बोगस बिलांसाठी दिली असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. ‘लोकमत’ला या जुन्या बिलांच्या ठेकेदारांना अदा केलेल्या काही बिलांच्या पावत्यादेखील मिळाल्या आहेत.
सध्या कोविडमुळे अनेकांचे रोजगार गेले असताना, सदर ९० कोटींच्या रकमेचे मिळालेले अनुदान सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत नाईक यांनी मोठ्या प्रमाणात जुनी बोगस बिले काढून संबंधित कंत्राटदारांना दिली असून, सामान्य जनतेच्या पैशांची लूट केल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थकरण झाल्याची माहिती असून, एका बिलामागे संबंधित कंत्राटदाराकडून ३० टक्के रक्कमही या अधिकाऱ्याला दक्षिणा म्हणून द्यावी लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भष्ट कारभारात नाईक यांना आनंद कदम हा या खात्यातील कॉम्प्यूटर ऑपरेटर मदत करत असून, तो गेली १० ते १२ वर्षे या जागेवर चिकटून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वरील विषयान्वये इलाका शहर विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, तत्कालीन कार्यकारी अभियंता हरीश पाटील, स्वामीदास चौबे व सा. ब.पाटील यांच्या काळातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, त्यांच्या काळात अदा केलेल्या अनेक बिलांच्या चौकशाही झाल्याचे समजते. या वरील अधिकाऱ्यांनी १०० कोटींची बोगस बिले तयार केली होती. नंतर काही कारणास्तव इलाखा शहर विभागातून त्यांची बदली झाल्याने त्यांच्या काळातील बिले प्रलंबित राहिली होती.
या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांच्या काळातील १०८ कोटी व ५८ कोटी रकमेच्या देयकांची चौकशी झाली असता, तत्कालीन सरकारने २०१५ साली वरील संशयास्पद बिले देण्यास स्थगिती दिली. तत्कालीन अधीक्षक अभियंता जयंजाळ यांनी सर्व देयके बोगस असल्याची तक्रार करून मंत्रालयात पत्रव्यवहार केला होता, परंतु यानंतर आलेल्या कार्यकारी अभियंता संजय इंदुलकर, एच.पी. सावंत व विद्यमान कार्यकारी अभियंता चंद्रकांत नाईक यांनी ठेकेदारांकडून ३० टक्के रक्कम घेऊन संबंधित बोगस बिले पारित केली.
या प्रकरणी कार्यकारी अभियंता चंद्रकांत नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, सदर आरोप हे बिनबुडाचे असून, नियमाप्रमाणे आम्ही सर्वांना समान न्याय देत, कोविड काळातील ठेकेदारांची बिले आदा केली आहे. यामध्ये कोणतेही अर्थकरण झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
------------------------------