टिटवाळा : गेल्या दोन महिन्यांपासून सतत वीजपुरवठा खंडित होण्याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ केल्याची घटना गोवेली गावात घडली. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी इंदिरानगरमधील नागरिकांनी केली आहे. कल्याण तालुक्यातील गोवेली येथे वितरण कंपनीचे उपकेंद्र आहे. या उप केंद्राच्या बाजूला असणाऱ्या इंदिरानगरमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे येथील शेकडो नागरिकांना ऐन पावसाळ्यात विजेशिवाय दिवस-रात्र काढावे लागत आहे. तसेच पिण्याच्या पाणी योजना बंद होऊन पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर साप, किडे यामुळे धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात गुरुवारी दुपारी १२ वाजता येथील काही महिला वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एस.जी. परसुटकर व लाइनमन कराळे उपस्थित होते. त्यांना संबंधित महिलांनी विजेबाबत प्रश्न विचारताच उत्तरे न देता त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप महिलांनी केला आहे.या प्रकारानंतर इंदिरानगरचे रहिवासी आक्रमक झाले असून, गोवेली येथील वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानीविरोधात कंपनीच्या वरिष्ठांनी कारवाई केली नाही, तर कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. (वार्ताहर)त्या दिवशी चार ते पाच ठिकाणी मोठा फॉल्ट झाला होता. तो दुरूस्त करून तुमच्याकडे येतो इतकेच आपण बोललो. शिवीगाळवगैरे असा काही प्रकार झालेला नाही. इंदिरानगर रहिवाशांनी याचा कांगावा केला आहे. - एस.जी. परसुटकर, कनिष्ठ आभियंता, गोवेली
वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची अरेरावी
By admin | Published: June 29, 2015 2:25 AM