लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे समाजातील अनेकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. याची झळ देहविक्रय करणाऱ्या महिलांनासुद्धा बसली आहे. त्यांच्यापैकी अनेक जणी स्थलांतरित आहेत. स्वत:ची ओळख पटवून देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे दस्तावेजही नाहीत. समाजातील अशा वंचित व दुर्लक्षित महिलांसाठी विलेपार्ले येथील ‘सूर ताल कराओके सिंगिंग क्लब’तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पठ्ठे बापूराव मार्ग, तसेच गिरगावातील कांदेवाडी येथील अशा १०० वंचित महिलांना या क्लबतर्फे अमृता देवधर यांनी मदत केली. कोरोनाचा धोका अजून पूर्णतः टळलेला नाही. परिणामी, सर्वत्र अस्थिरता असल्याने यापुढेही मुंबईतील अनेक गरजूंना, त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात ४० गरजू महिलांना आवश्यक ती मदत करण्यात येणार आहे.
---------------------------------------------------------------------------------------------