Join us  

पोलीस दलातील १०९ कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या विरार येथील सदनिकांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालघर पोलीस दलातील १०९ कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार-बोळींज येथे उभारलेल्या गृहनिर्माण योजनेतील इमारत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पालघर पोलीस दलातील १०९ कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार-बोळींज येथे उभारलेल्या गृहनिर्माण योजनेतील इमारत क्रमांक १०मधील सदनिका क्रमांकांची निश्चिती व वितरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

सदनिका निश्चित झालेल्या पालघर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी प्रवीण आव्हाड, जागृती मेहेर, रुक्मिणी राठोड, अदिती सरनोबत, फिरोझ तडवी यांना सदनिकेचे प्रथम सूचना पत्रही प्रदान करण्यात आले. काेकण मंडळातर्फे उर्वरित सदनिका लाभार्थ्यांना लवकरच प्रथम सूचना पत्र पाठविली जाणार आहेत.

विरार - बोळींज येथे सुमारे ११९ एकर जमिनीवर गृहनिर्माण योजना विकसित करण्यात आली आहे. या योजनेतील टप्पा - ३ मधील इमारत क्रमांक १० मधील १८६ सदनिका पालघर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

१८६ सदनिकांसाठी पालघर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी मार्च २०१९मध्ये जाहिरात देण्यात आली हाेती. त्यानुसार पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून १०९ अर्जदारांच्या नावांची यादी पाठविण्यात आली. या १०९ कर्मचाऱ्यांना इमारतीतील कितव्या मजल्यावर, कोणत्या क्रमांकाची सदनिका वितरित करायची, याची निश्चिती व त्यांचे वितरण करण्यात आले.

पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी प्राप्त झाल्यास उर्वरित ७७ सदनिकांचेही वितरण करण्यात येणार आहे. सदनिकांचे चटई क्षेत्रफळ ४३४.९७ ते ४५३.२७ चौरस फूट असून, या सदनिकांची अंदाजित विक्री किंमत २७ लाख रुपये आहे. टप्पा - ३ मधील इमारतींना वसई - विरार शहर महानगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे.

--------------------