Join us

संचारबंदीमुळे अडकलेल्या गरजूंना जेवण व रेशनचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 3:58 PM

संचारबंदीमुळे अडकलेल्या गरजू नागरिकांना जेवण व रेशन वितरण

संचारबंदीमुळे घरी अडकलेल्या गरजूंना जेवण व रेशन वितरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी राज्यात संचार बंदी लागू करण्यात आल्याने नागरिकांना घरी थांबण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. हॉटेल व खाणावळी बंद झाल्याने एकटे राहणाऱ्या नागरिकांचे खाण्याचे हाल होत आहेत. अशा गरजू व ज्यांचे हातावर पोट आहे अशा गरीब व्यक्तींना मदत करण्यासाठी जमात ए इस्लामी हिंद ने पुढाकार घेतला आहे. अशा नागरिकांना जमात तर्फे जेवणाचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. गरजूंनी जमात च्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जमाततर्फे करण्यात आले आहे. मुंबई मध्ये कुर्ला, मदनपुरा, सहित इतर ठिकाणी जेवण व रेशन वाटप करण्यात आले अाहे. जेवणाचे बॉक्स तयार करण्यात आले असून वाटप करताना गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात अाहे. जेवण बनवताना व बॉक्स तयार करुन वितरण करताना सुरक्षेची काळजी घेतली जात आहे, असे जमात ए इस्लामीचे सचिव हुमायुं शेख यांनी स्पष्ट केले. शहरातील प्रत्येक गरजूसाठी ही सुविधा उपलब्ध असून विनासंकोच याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.