६५ टक्के शिधापत्रिकाधारकांना आतापर्यंत अन्नधान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 01:38 AM2020-06-24T01:38:47+5:302020-06-24T01:38:52+5:30
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्याच्या नियमित धान्यवाटपापैकी ६५ टक्के अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे.
मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्याच्या नियमित धान्यवाटपापैकी ६५ टक्के अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रति माणसी पाच किलो मोफत तांदूळ व प्रति शिधापत्रिका एक किलो चणाडाळ किंवा तूरडाळ देण्यात येत आहे. त्यापैकी मोफत तांदळाचे ३५ टक्के शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आले असून १०८२ मेट्रिक टन डाळीचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेल्या व वार्षिक ५९ हजार ते १ लाख उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रति माणसी ८ रुपये प्रतिकिलो दराने तीन किलो गहू व १२ रुपये किलो दराने दोन किलो तांदूळ वितरित करण्यात येत आहेत.
जून महिन्यात ८९२ मेट्रिक टन तांदूळ व १५३५ मेट्रिक टन गहू यांचे ८ टक्के शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेत समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय साहाय्य पॅकेजअंतर्गत मे व जून महिन्यासाठी प्रतिमाणसी पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येत असून त्यामधून ६८२ मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात आले आहेत. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तीन किलो गहू (दोन रु. किलो दराने) व दोन किलो तांदूळ (तीन रु. किलो दराने) वाटप करण्यात येत आहे.