Join us

नगरसेवकांनी काढले बेकायदेशीर कामांचे वाभाडे

By admin | Published: March 17, 2015 11:06 PM

जव्हार नगरपरिषदेची तहकूब सभा सोमवारी न. प. सभागृहात मोठ्या वादळी वातावरणात पार पडली.

जव्हार : जव्हार नगरपरिषदेची तहकूब सभा सोमवारी न. प. सभागृहात मोठ्या वादळी वातावरणात पार पडली. ३३ विषयांपैकी उर्वरीत असलेले १४ विषय सभेत चर्चिले जात असताना पाणीपुरवठा, कर सर्वेक्षण व वसूली, बांधकाम, भाडे वसूली बाबत संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय बेजबाबदार व बेकायदेशीर कारभार करून सर्व नगरसेवकांना अडचणीत आणले होते. जिमखाना हॉल येथील परिसर परस्पर भाड्याने देणे, सूर्य तलाव येथील पाणी ठेकेदाराला देण्याबाबत मुख्याधिकारी यांनी हा विषय सर्वसाधारण सभेपुढे न आणता परस्पर पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेतला, राकेश शिवदे यांच्या गाळाभाडे रद्द करून घरपट्टी आकारणी करणे बाबत आलेल्या अर्जावर निर्णय घेणे या विषयावर नगरसेवक गणेश रजपूत यांनी आक्रमक भूमिका घेत ठिकाणी गाळा नसून तेथे स्लॅबची भव्य अतिक्रमण इमारत आहे. सदर इमारतीचे सर्वेक्षण करताना कर वसूली विभाग प्रमुख अतुल पिंपळे यांनी खोटा पंचनामा करून सभागृहाची पर्यायाने शासनाची फसवणूक केली म्हणून पिंपळे यांना तात्काळ निलंबीत करून त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना पिंपळे यांनी सन २०१२-१३ साली संपूर्ण शहराचे कर सर्वेक्षण करताना हितसंबंधीताना झुकते माप दिले आहे. त्यांच्या कर सर्वेक्षणात अनेक तफावती असल्यामुळे त्यांच्या सर्वच प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी केल्यास व त्यांच्या मालमत्ते संबंधात अधिकृत माहिती घेतल्यास त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर पडतील असे सभागृहाचा निदर्शनास आणून दिले. प्रदिप राऊत यांच्या जुना राजवाडा येथील टपरीचे भाडे व घरपट्टी आकारणी बाबत आलेल्या अर्जावर रविंद्र भोईर यांनी कोणत्याही समितीची परवानगी नसताना टपरी कोणत्या निकषावर ठेवण्यात आली. वास्तविक तत्कालीन राजे यशवंतराव मुकणे यांनी ज. न. ला. जुना राजवाडा येथील जागा दान केली असून नियमानुसार नगरपालिकेला त्या जागेमधून कोणतेही उत्पन्न घेता येवून शकत नाही. परंतु अतुल पिंपळे यांनी कोणाच्या सांगण्यावरून ही टपरी बेकायदेशीरपणे ठेवल्यास परवानगी दिली तसेच मागील दीड वर्षापासून त्या टपरीचे भाडे व अनामत रक्कम सुद्धा घेतले नसल्याने न. प. चे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे न. प. चे आर्थिक नुकसान करणाऱ्या गाळे वसूली लिपीक पिंपळे यांची तत्काळ बदलीची मागणी केली. न. प. चे लाखो रू.चे अशा प्रकारचे नुकसान करणाऱ्या अतुल पिंपळे यांच्या पगारातून त्यांनी केलेले आर्थिक नुकसान वसूल करण्याचा आग्रह भोईर यांनी केला. यशवंत नगर येथील अस्तित्वात असलेली इमारत ही शासकीय जागेत असून ती अतिक्रमीत व बेकायदेशीर आहे. या अनधिकृत बांधकामाबाबत नगरपरिषदेने तहसिलदार जव्हार यांच्याकडे पत्रव्यवहार करावा. त्याची सखोल चौकशी करून जागा खाली करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करू.- अरूण विठ्ठल कनोजे, शासन नियुक्त नगराध्यक्षसर्वसाधारण सभेतील पटालावर अनेक महत्वाचे विषय कोणत्याही विषय समितीवर न आणता नियमबाह्य पद्धतीने प्रशासन जर लावत असेल तर आम्हा नगरसेवकांना बोलवून अशा बेकायदेशीर ठराव आमच्याकडून मंजूर का करवून घेता. अशामुळे आमचे नगरसेवकपद धोक्यात येवू शकते. असेच असेल तर या पुढील सभा तुम्हीच चालवा.- अमोल औसरकर, सभापती