मुंबई : मुंबई शहर जिल्हा परिसरातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना गुरूवारी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते खावटी अनुदानांतर्गत अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना रेशनकार्ड, आधारकार्ड मिळविण्यासाठी तसेच इतर समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे शेख यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय, मुंबई यांच्यावतीने गुरुवारी अनुसूचित जमातीतील लाभार्थी कुटुंबांना खावटी अनुदान योजनेतील अन्नधान्य किटचे वाटप मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या छोटेखानी समारंभात करण्यात आले. यावेळी आमदार अमीन पटेल, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी बोरकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्यासाठी राज्य शासनाने खावटी अनुदान योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यानुसार, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील १ हजार ९२४ कुटुंब खावटी अनुदान योजनेसाठी पात्र ठरली आहेत. त्यामध्ये उपनगरमधील १ हजार ८१८ आणि मुंबई शहरातील १०६ कुटुंबांचा समावेश आहे. गुरुवारी मुंबई शहरातील १०६ कुटुंबांपैकी १२ कुटुंबांना पालकमंत्री शेख आणि पटेल यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील १ हजार ७६० कुटुंबांच्या बँक खात्यात खावटी अनुदानाचे प्रत्येकी दोन हजार रूपये थेट वर्ग करण्यात आले आहेत.