‘लोकमत उद्योग’ पुरस्काराचे होणार आज वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:52 AM2018-12-22T06:52:49+5:302018-12-22T06:53:01+5:30
‘लोकमत आदर्श उद्योजक’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी सकाळी १० वाजता रवींद्र नाट्य मंदिरात रंगणार आहे. उद्योग क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या उत्कृष्ट उद्योजकांना लोकमत आदर्श उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
मुंबई : ‘लोकमत आदर्श उद्योजक’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी सकाळी १० वाजता रवींद्र नाट्य मंदिरात रंगणार आहे. उद्योग क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या उत्कृष्ट उद्योजकांना लोकमत आदर्श उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सन्मान होईल. युक्ती मीडिया आयोजित आणि साहिब रिअॅल्टी प्रस्तुत ‘लोकमत आदर्श उद्योजक पुरस्कार-२०१८’ सोहळ्याचे आयोजन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे मिनी थिएटरमध्ये करण्यात आले आहे.
लघू व मध्यम उद्योगक्षेत्रातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी अमित आचरेकर (संचालक - वा कॉर्पोरेशन), उज्ज्वला बाबर (संचालिका - माऊली असोसिएट्स), आशुतोष ठाकूर (संचालक - सौर इंजिनीअर अॅण्ड कन्सल्टन्ट प्रा.लि.), आनंद शेट्ये (संचालक - रंगशलाका), चित्रलेखा वैद्य (संचालिका - वर्षासूक्त प्रा. लि.), परशुराम शिवणकर (संचालक - यश कन्स्ट्रक्शन्स), महेश वाघ (संचालक - ई-किडा प्रा.लि.), मंदार पाटील (संचालक - पाटील मॅजिक्स), रमेश गुरव (संस्थापक - लक्ष्मी मेकॅनिकल अॅण्ड इंजिनीअर कंपनी), सचिन पाटील (संस्थापक/ संचालक सचिन्स स्टुडिओ), सागर जोशी (संस्थापक - आरएसए आॅटो आयकेअर प्रा.लि.) आणि श्रीकृष्ण पाटील (संचालक - अप्रमश्री आॅटोमेशन्स प्रा.लि.) या उद्योजकांचा सन्मान करण्यात येईल.
विशेष मार्गदर्शन
शून्यातून उद्योगविश्व निर्माण केलेल्या तरुण उद्योजकांना ‘लोकमत’च्या माध्यमातून ‘लोकमत आदर्श उद्योजक पुरस्कार-२०१८’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी लक्ष्यवेधचे सर्वेसर्वा प्रेरक वक्ता अतुल राजोळी उद्योजकांना ‘युक्ती उद्योगाची’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच ‘मनोरंजन क्षेत्रातील उद्योगाच्या संधी’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता निर्माता दिग्दर्शक सचिन पिळगांवकर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा सहभाग लाभणार आहे. कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ८१०८१०५२२९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.