लखनऊ पालिकेच्या बाँडचे मुंबईत वितरण; ‘बेल रिंगिंग’ला आदित्यनाथ यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 01:27 AM2020-12-03T01:27:55+5:302020-12-03T01:28:06+5:30
मुंबई स्टाॅक एक्सचेंजला भेट देणारे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
मुंबई : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ महापालिकेचे बाँड बुधवारी वितरित करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मुंबई स्टाॅक एक्सचेंज येथे यासाठीचा बेल रिंगिंग सेरेमनी पार पडला. उत्तर प्रदेशातील महापालिकांना वित्तीय शिस्त लागावी आणि पायाभूत विकास, सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
लखनऊ पालिकेने २०० कोटींचे म्युनिसिपल बाँडचे शेअर बाजारात लिस्टिंग करून आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल टाकल्याचे आदित्यनाथ या वेळी म्हणाले. लखनऊ पालिकेच्या या बाँडसना ४५० कोटींची बोली लावण्यात आली. गुंतवणूकदारांचा पाठिंबा उत्साहवर्धक असल्याचे सांगत आगामी काळात गाझियाबादचे बाँडही आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशातील लघू व मध्यम उद्योगांना वित्तीय व्यवस्थेत आणण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत १५ व्यावसायिकांनी आपले व्यवसाय मुंबई स्टाॅक एक्सचेंजमध्ये नोंदविले आहेत, असे यावेळी त्यांनी सांगितले.
मुंबई स्टाॅक एक्सचेंजला भेट देणारे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. लखनऊ पालिकेच्या बाँड्सचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी शेअर मार्केटचा इतिहास जाणून घेताना प्रत्यक्ष खरेदी-विक्रीही पाहिली. त्यानंतर येथील प्रसिद्ध बैलाच्या शिल्पाजवळ फोटोसेशनही केले. स्टाॅक एक्सचेंजमधील कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी हाॅटेल ट्रायडेंट येथे मुंबईतील उद्योजक व सिनेजगतातील मान्यवरांशी संवाद साधला.