लोकसभेला दणका, विधानसभेची चिंता! यामिनी जाधवांना का करावे लागले बुरख्याचे वाटप?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 01:45 PM2024-09-12T13:45:05+5:302024-09-12T14:03:40+5:30

शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यात आल्याचे समोर आलं आहे.

Distribution of burqas to Muslim women by Shinde group MLA Yamini Jadhav | लोकसभेला दणका, विधानसभेची चिंता! यामिनी जाधवांना का करावे लागले बुरख्याचे वाटप?

लोकसभेला दणका, विधानसभेची चिंता! यामिनी जाधवांना का करावे लागले बुरख्याचे वाटप?

MLA Yamini Jadhav : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच महायुतीकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झालीय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून आता विविध आश्वासनं दिली जात आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी राबवलेल्या एका उपक्रमामुळे त्या विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत. आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी भायखळ्यात बुरख्याचे (नकाब) वाटप केले आहे. त्यामुळे आता हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिंदे गटाला मुस्लिमांचा आठवण कशी झाली अशी टीका विरोधकांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायाने महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा ही बाब बोलून देखील दाखवली होती. विधानसभा निवडणुकीतही याचा फटका बसू नये म्हणून महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच आता यामिनी जाधव आमदार असलेल्या मुस्लिम बहुल भायखळा परिसरात बुरखा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. 

शिवसेना शिंदे गटाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यात आलं आहे. शिंदे गटाच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून हे बुरखा वाटप करण्यात आलं आहे. या संदर्भातील एक बॅनर भायखळा येथे लावण्यात आला होता. बॅनरचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हिंदुत्ववादी अशी ओळख असलेल्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे कार्यक्रम केले जात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कार्यकर्ते मुलींना शाळेत बुरखा घालण्यापासून रोखत असताना, इथे दान केले जात आहे. हा ढोंगीपणा आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

लोकसभेला भायखळ्यातच यामिनी जाधवांना मोठा फटका

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा ५२ हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत यामिनी जाधव ज्या भायखळा विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करतात त्याच मतदार संघातून अरविंद सावंत यांना सर्वाधिक मतं मिळाली होती. ठाकरे गटाचे आमदार असलेल्या वरळी आणि शिवडीपेक्षाही अधिक मतं अरविंद सावंत यांना भायखळा मतदार संघात मिळाली. भायखळा विधानसभा मतदार संघात यामिनी जाधव यांना ४० हजार ८१७ मतं मिळाली. तर अरविंद सावंत यांना दुप्पट म्हणजे तब्बल ८६ हजार ८८३ मतं मिळाली. यामिनी जाधव यांच्यापेक्षा सावंत यांना या एकट्या मतदार संघात ४६ हजार ६६ मतांची आघाडी मिळाली. 

त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम मतदारांना आकर्षिक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यामुळे त्या विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत.

Web Title: Distribution of burqas to Muslim women by Shinde group MLA Yamini Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.