गोराईत १२५ आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप
By मनोहर कुंभेजकर | Published: March 9, 2023 01:45 PM2023-03-09T13:45:33+5:302023-03-09T13:46:09+5:30
२५ % मुलींची शाळेत गैरहजेरी लागते. मासिक पाळी स्वच्छता ही काळाची गरज आहे आणि सॅनिटरी पॅड ही महिलांसाठी विलासी गोष्ट नसून ती त्यांच्यासाठी एक मूलभूत गरज आहे.
मुंबई - गोराईच्या १२५ आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप करून साजरा केला काल सायंकाळी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी व बोरीवलीचे स्थानिक आमदार सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी बोरीवली विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा रेश्मा शंकर निवळे यांच्या तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त बोरिवली पश्चिम पलीकडील डोंगरी गोराई येथील १२५ आदिवासी महिला व मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप केले. तसेच महिला पोलिस अधिकारी व सफाई कर्मचारी भगीनीचा साडी देऊन सत्कार केला.
आपल्या प्रास्ताविक भाषणात रेश्मा निवळे म्हणाल्या की, आपल्या देशात सुमारे ६० करोड महिला आहेत. त्यातील सुमारे ३६.५ करोड महिलांना मासिक पाळी येते. यातील फक्त १५% मुली व महिलाच सॅनिटरी पॅड वापरतात. सुमारे ८५% महिला अजूनही सॅनिटरी पॅड वापरत नाहीत. ज्यामुळे दरवर्षी कित्येक महिलांना सर्व्हिकल कॅन्सर सारखे आजार होतात. २५ % मुलींची शाळेत गैरहजेरी लागते. मासिक पाळी स्वच्छता ही काळाची गरज आहे आणि सॅनिटरी पॅड ही महिलांसाठी विलासी गोष्ट नसून ती त्यांच्यासाठी एक मूलभूत गरज आहे. समाजात काम करताना वंचित दुर्लक्षित भागातील महिलांसाठी काहीतरी करता यावे आणि त्यांच्यासाठी समाज उपयोगी उपक्रम राबविण्यासाठी येथील १२५ आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप केले अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी गोराई पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस अधिकारी मंदाकिनी नरोडे व प्रमिला कावळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगीता पाटील, महामंत्री बोरीवली विधानसभा मंजू सिपानी, स्मिता मोरजकर, वार्ड अध्यक्ष आरती करगुटकर,मनिषा व्यास, प्रिया पाटील, प्रतिमा मिस्त्रि,नेहा गोहिल समाजसेविका सुनिता नागरे, सुषमा दवडे आदी मान्यवर उपस्थित होते.