जम्बो कोविड सेंटरमधील साहित्य राज्यातील रुग्णालयांना, महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपयांच्या सामानाचे वाटप
By संतोष आंधळे | Published: January 2, 2023 08:35 AM2023-01-02T08:35:52+5:302023-01-02T08:36:31+5:30
कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर हे जम्बो सेंटर बंद झाले, मात्र आता त्यातील साहित्याचे वाटप करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला असून, राज्यातील शासकीय रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांच्या सामानाचे वाटप महिनाभरापासून सुरू आहे
मुंबई : कोरोना काळात दोन वर्षांत रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साधनसामग्री खरेदी करण्यात आली होती. विशेष म्हणजे रुग्णालयाव्यतिरिक्त ९ जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. रुग्णालयात उपचारासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे ठेवल्या होत्या. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर हे जम्बो सेंटर बंद झाले, मात्र आता त्यातील साहित्याचे वाटप करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला असून, राज्यातील शासकीय रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांच्या सामानाचे वाटप महिनाभरापासून सुरू आहे.
कोरोना काळात मुंबई शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट होते. ज्यावेळी कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. रुग्णालयात रुग्णांना उपचार देणे शक्य नव्हते. त्यावेळी महापालिकेतर्फे कोविड जम्बो सेंटर उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात होते. विशेष म्हणजे १५ हजारांपैकी निम्म्याहून अधिक बेड्स ऑक्सिजन उपकरणाने जोडले गेले होते, तर ६५० बेड्सना व्हेंटिलेटरची सुविधा करण्यात आली होती.
या जम्बो सेंटरमध्ये, बीकेसी, नेसको, एनएससीआय, मुलुंड, मालाड, दहिसर, कांजूरमार्ग, सोमय्या ग्राऊंड, रिचर्डसन क्रुडास कंपनी, रेसकोर्स येथील सेंटरचा समावेश होता. या सेंटरमध्ये महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपयांची साधनसामग्री खरेदी करण्यात आली होती. तसेच काही सामाजिक संस्थांनी पुढे येऊन मदत केली होती, तर काही प्रमाणात केंद्राची मदतही झाली होती. या सेंटरमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन उपकरणे, टेबल, खुर्च्या, पंखे, चादर, उशा तसेच कोविडशी संबंधित साधनसामग्री होती.
‘सेव्हन हिल्स’मध्ये पाहणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर जे. जे. रुग्णालयाचे काही वरिष्ठ डॉक्टर या सामानाची पाहणी करण्याकरिता सेव्हन हिल्स रुग्णालयात गेले होते. त्यानंतर रुग्णालयातील विविध विभागांनी कोणत्या वस्तूची गरज आहे, याची यादी रुग्णालय प्रशासनाला दिली होती. त्यानंतर ती माहिती एकत्र करून महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार होती.
कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र त्यामधील वैद्यकीय साधनसामग्री धूळ खात पडण्यापेक्षा त्याचा वापर होणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही राज्यातील शासकीय रुग्णालयांना हे साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे महिनाभरापासून ते काम सुरू आहे. पुणे येथील शासकीय रुग्णालय, काही केंद्रांच्या अखत्यारितील रुग्णालये तसेच मुंबईतील शासकीय रुग्णालयांना आम्ही कळविले आहे. संबंधित रुग्णालय त्यांच्या गरजेनुसार साहित्य घेऊन जात आहे. - डॉ. संजीवकुमार, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका.