मुंबई :
महाराष्ट्रभूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते येत्या रविवारी कॉर्पोरेट पार्क, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रभूषण पुरस्काराची उंची वाढणार आहे. म्हणूनच आपण सर्वांनी झोकून देऊन काम करूया.! इतिहासात नोंद घेतली जाईल, ‘न भूतो-न भविष्यती असा हा सोहळा करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी खारघर येथे केले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रभूषण २०२२ पुरस्कार प्रदान पूर्वतयारी आढावा बैठक खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात पार पडली. या बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्याचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे. शासनाची आणि प्रशासनाची ही सर्वस्वी जबाबदारी आहे. कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेने उपायुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीसाठी समन्वय राखण्यासाठी नेमावा. सर्वच घटकांनी जबाबदारीचे भान ठेवून दिलेली जबाबदारी योग्यरीतीने पार पाडावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय या व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जावे. कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावी, पोलिसांबरोबर ट्रॅफिक वॉर्डननाही या व्यवस्थेत सहभागी करून घ्यावे, असे सांगून या दिमाखदार कार्यक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम ज्या मैदानात होणार आहे त्या मैदानाची व तेथील इतर व्यवस्थांची पाहणी केली.