Join us  

मतदार जनजागृतीबाबत जिल्हा प्रशासनाला जाग

By admin | Published: October 13, 2014 12:59 AM

मतदानासाठी प्रोत्साहन देणाऱ्या जनजागृतीचा अभाव’ असे वृत्त लोकमतने नुकतेच प्रसिद्ध केले. याची दखल घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय नागरिकांचा सहभाग जास्तीतजास्त वाढावा

ठाणे : ‘मतदानासाठी प्रोत्साहन देणाऱ्या जनजागृतीचा अभाव’ असे वृत्त लोकमतने नुकतेच प्रसिद्ध केले. याची दखल घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय नागरिकांचा सहभाग जास्तीतजास्त वाढावा, या हेतूने स्वीप-२ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.हा कार्यक्रम या निवडणुकीत यशस्वी करण्यासाठी आता जिल्हास्तरीय समितीची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आता गठीत झाली आहे. जिल्ह्यातील शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख या समितीचे सदस्य असून उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी या समितीचे सदस्य सचिव व समन्वय अधिकारी आहेत. यांच्या नियंत्रणासह मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मतदार जनजागृतीच्या कार्यक्रमासह मतदार स्लीप वाटण्याचे काम दुसरा शनिवार असूनही जिल्ह्यातील संबंधित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आदी बीएलओम्हणून युद्धपातळीवर कामाला लागल्याचे दिसले.लोकसभा निवडणुकीच्या वेळी भारत निवडणूक आयोगातर्फे छायाचित्र प्रदर्शनाद्वारे मतदान कसे करावे, मतदान करताना कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे, कोणत्या बाबी टाळाव्यात आणि मतदान का करावे आदींची माहिती देऊन मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणाऱ्या जनजागृतीच्या अपेक्षा मतदारांकडून होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले असता त्याची तत्काळ दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. सार्वजनिक बसेस, मल्टीप्लेक्स व सिनेमा थिएटर, मल्टीशॉप मॉल, महापालिका प्रभाग समिती कार्यालये, रेशन दुकाने, तहसीलदार, कार्यालये आदी सरकारी ठिकाणीदेखील पोस्टर व बॅनर्स लावण्यात येत आहेत. याशिवाय, हॅण्डबिल वाटपासह संकल्पपत्र, व्होटर्स स्लीप वाटप, ध्वनिक्षेपकामार्फत संदेश देण्याचे काम सुरू केल्याचा दावा केला आहे. यामध्ये महापालिका, नगरपालिकांसह नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा संघ, जिल्हा महिला व बालकल्याण विकास विभाग, शाळा, महाविद्यालयांचा सहभाग आहे. आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण, राष्ट्रीयीकृत व खाजगी बँका, एटीएम यंत्रणा, एमआयडीसी, जिल्हा उपनिबंधक आदी यंत्रणांद्वारे जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे.