जितेंद्र कालेकर ल्ल ठाणे बहुचर्चित ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निर्णय गुरुवारी लागणार आहे. अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड बिनविरोध झाली नाही तर मतदान घेण्यात येणार आहे. त्यात ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते असतील त्याचीच अध्यक्षपदी निवड होणार आहे. त्यामुळे भूमीगत झालेले संचालक अखेरच्या क्षणी कोणाच्या पारड्यात मताचे- दान टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक ५ मे रोजी झाल्यानंतर ‘सहकार’चे ११, ‘लोकशाही सहकार’चे ९ आणि दोन अपक्ष संचालक निवडून आले आहेत. उपांत्य फेरीत ‘सहकार’ने बाजी मारली असली तरी अंतिम अर्थात अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे पॅनल बाजी मारणार त्यांच्याकडेच बँकेची सत्ता येणार आहे. सहकारमधून अशोक पोहेकर, बाबाजी पाटील, राजेश पाटील, भाऊ कुऱ्हाडे आणि प्रशांत पाटील असे एकापेक्षा एक नेते अध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत. तर ‘लोकशाही’ मधून शिवाजी शिंदे यांचे एकमेव नाव घेण्यात येत आहे. आमच्या पॅनलमधून दोन बिनविरोध आणि सात निवडणूकीत असे नऊ निवडून आले असले तरी ऐनवेळी या ९ चे १२ की १३ संचालक होतात, हेच पहायचे आहे. त्यामुळे अध्यक्ष पदावर ‘लोकशाही सहकार’ अर्थात वसई विकास आघाडीचाच विजय होईल, असा दावाही ठाकूर यांनी केला आहे. तडजोडी त्यांना करायच्या आहेत. तिकडे सर्व नेते मंडळी आणि त्यांची मुले निवडून आलीत. तर इकडे, सामान्य कार्यकर्ता. एका बाजूला राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असे सर्व राजकीय पक्ष तर दुसरीकडे फक्त वसई विकास आघाडी ही लढत असल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपला लोकशाही पॅनलमुळे एकत्र यावे लागले, ही एक मोठी बाब असल्याचे याच पॅनलच्या एका संचालकाने सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्या सहकार पॅनलमधील नेते अशोक पोहेकर आणि बाबाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही आमच्याकडे बहुमत असून बँकेवर सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद एकेक वर्षासाठी देऊन १० संचालकांना ही पदे ५ वर्षांत देण्याची खेळीही खेळली जाते आहे. तसे झाले तर बँकेचे सत्ताकारण अधिकच अस्थिर होण्याची शक्यता आहे. एकीकडे सर्वच पक्षांच्या आघाडीतून आलेले सहकार पॅनल तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील बंडखोरांच्या मदतीने आलेले बहुजन विकास आघाडीचे लोकशाही सहकार पॅनल अशी लढत आहे. यातून कोणतेही पॅनल आले तरी बहुपक्ष असलेले पॅनल सत्तेवर येणार आहे. विरोधी पक्षही तितकाच ताकदवान असल्यामुळे बँकेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांची खरी कसोटी लागणार आहे. दणदणीत बहुमताने सत्तेवर आलेल्या एकाच पक्षाच्या अथवा नेतृत्वाखाली संचालक मंडळाचे वर्चस्व असले की, त्यांच्या कलाने निर्धास्त कारभार करता येतो. परंतु सत्ताधारी बहुपक्षीय आघाडीचे आणि विरोधीपक्षही अत्यंत तगडा अशी स्थिती असली की, बँकेच्या अधिकाऱ्यांची अवस्था दोन बायका आणि फजिती एैका अशी होते, असे एक अधिकारी म्हणाला.
जिल्हा बँक अध्यक्षपदाचा फैसला आज
By admin | Published: May 20, 2015 10:47 PM