मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
मोहन डेलकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांच्यावर आहे. या आरोपात तथ्य नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. यावरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती.
डेलकर हे दादरा नगर या केंद्रशासित प्रदेशाचे खासदार होते. त्यांनी मरीन ड्रॉईव्ह येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्यांची सुसाईड नोट पोलिसांना सापडली. डेलकर यांच्या मुलाने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला. अभिनव डेलकर याने केलेल्या तक्रारीनुसार, दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल आणि स्थानिक सरकारी अधिकारी यांनी डेलकर यांची छळवणूक केली होती. कारण त्यांना निवडणूक लढवण्यापासून डेलकर यांना अडवायचे होते. तसेच त्यांच्या महाविद्यालयाचा ताबा घेण्यापासून थांबवायचे होते.
‘आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी कट रचण्याची आवश्यकता आहे, ते या प्रकरणात दिसत नाही. केवळ छळवणुकीचा आरोप केला म्हणून पोलीस कोणावरही आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप करू शकत नाही. सिंह यांच्यावर कोणताही विशिष्ट आरोप ठेवण्यात आलेला नाही. ते डेलकर यांना वैयक्तिकरीत्या ओळखत नव्हते. डेलकर अध्यक्ष असलेल्या ट्रस्टची ते चौकशी करत होते, एवढाच सिंह आणि डेलकर यांचा परिचय होता’, असा युक्तिवाद सिंह यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयात केला. न्यायालयाने पुढील सुनावणी गुरुवारी ठेवत तोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले.