Join us  

जिल्हा परीषदेच्या तक्रारींचे निराकरण होणार

By admin | Published: August 08, 2015 9:46 PM

जिल्हा परिषदेच्या प्रकल्पांतर्गत सुमारे १७ विभागांसह पाच पंचायत समित्यांविषयी प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारी, अर्जांचा निपटारा ‘आपले सरकार’ प्रकल्पांतर्गत नियुक्त करण्यात

ठाणे : जिल्हा परिषदेच्या प्रकल्पांतर्गत सुमारे १७ विभागांसह पाच पंचायत समित्यांविषयी प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारी, अर्जांचा निपटारा ‘आपले सरकार’ प्रकल्पांतर्गत नियुक्त करण्यात येणाऱ्या ‘झेडपी अ‍ॅडमीन’ अधिकाऱ्यांद्वारे करण्यात येणार आहे. १५ आॅगस्टपासून ही सेवा सुरू करण्याचे आदेश जि.प.ला देण्यात आले आहेत. राज्य शासनाने ‘आपले सरकार’ प्रकल्प हाती घेऊन विविध कार्यालयांमधील नागरिकांची कामे सहजतेने व्हावी, अर्जानुसार हवी असलेली माहिती, कागदपत्रे यांची माहिती त्यांना सहज मिळावी, केलेले अर्ज, तक्रारी यावर काय कारवाई होणार, किती दिवसांत होणार, कारवाई झाल्याचा संपूर्ण तपशील, आवश्यक कागदपत्रांच्या पूूर्ततेसाठी माहिती आदी माहिती नियुक्त करण्यात येणाऱ्या झेडपी अ‍ॅडमिनद्वारे नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर मेसेजद्वारे, ई-मेलद्वारे कळणार आहे. यासाठी ठरावीक कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. त्यासाठी नागरिकांना कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज भसणार नाही. जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी या पाच पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेच्या सुमारे १७ विभागांचे अर्ज किंवा लेखी तक्रारी झेडपी अ‍ॅडमिनद्वारे घेतल्या जाणार आहेत. याशिवाय, त्यावरील कारवाईची माहितीदेखील अ‍ॅडमिनकडून नागरिकांना मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणात या झेडपी अ‍ॅडमिनची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे. त्याद्वारे ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण विभाग, रोजगार हमी, सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, सर्वशिक्षा अभियान आदी सुमारे १७ विभागांसाठी नागरिकांना अर्ज करण्यासह त्यांच्यासंदर्भातील तक्रारीदेखील झेडपी अ‍ॅडमिनकडे करता येणार आहेत.