मुंबई : उन्हाच्या असह्य चटक्यांमुळे देशभरात उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उष्माघाताच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने पावले उचलत राज्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या आरोग्य केंद्रांना मार्गदर्शक तत्त्वे मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाठविल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयांसह सर्व शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहेत, याशिवाय पालिका रुग्णालयातील डॉक्टर्सना उष्माघातासंदर्भात प्रशिक्षित केले जाणार आहे. या संदर्भात अधिकाधिक जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.प्रखर उन्हात फिरू नका!वाढत्या उष्माच्या काळात आत लोकांनी आपापली कामे आटोपून घरी किंवा सावलीच्या ठिकाणी थांबावे. उन्हात जास्त काळ काम केल्याने किंवा जास्त उष्णतेचा संबंध आल्याने शरीराच्या नैसर्गिक तापनियंत्रण प्रणालीत बिघाड होऊन उष्माघाताचा धोका होऊ शकतो. त्यामुळे शरीराचे तापमान १०५ फॅरेनाइट किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकते. उन्हात शेतीवर किंवा मजुरीची कामे जास्त वेळ करणे, फार काळ उन्हात फिरणे, वेगवेगळ्या कारखान्यांतील बॉयलर विभागात काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर यामुळे उष्माघाताचा धोका संभवतो.
लक्षणे -बेशुद्ध अवस्था, उलटी होणे, भूक न लागणे, चक्कर येणे, शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, थकवा येणे, ताप येणे (१०२ पेक्षा जास्त), त्वचा कोरडी पडणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, अस्वस्थता.
उपाय -फार काळ कष्टाची कामे टाळावीत. अशी कामे सकाळी किंवा सायंकाळी तापमान कमी झाल्यानंतर करावीत. पाणी भरपूर प्यावे, ताक, पन्हे, नारळपाणी आदी शीतपेये प्यावीत. हलके, पातळ, सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. घरे थंड ठेवण्यासाठी कुलर, पंखा यांचा वापर करावा, बाहेर पडताना गॉगल्स, टोपी, टॉवेल, उपरणे यांचा वापर करावा. काळे कपडे वापरू नयेत.