Join us  

कैदी वाढल्याने जिल्हा कारागृह पडले अपुरे!

By admin | Published: June 23, 2014 3:06 AM

जिल्हा कारागृह आरोपींना अपुरे पडत असल्याने कारागृहासाठी शासनाची जागा मिळू शकेल का? यासंदर्भात कारागृह महासंचालक मीरा बोरवणकर जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याशी चर्चा केली

बोर्ली-मांडला : जिल्हा कारागृह आरोपींना अपुरे पडत असल्याने कारागृहासाठी शासनाची जागा मिळू शकेल का? यासंदर्भात कारागृह महासंचालक मीरा बोरवणकर या अलिबाग येथे येऊन त्यांनी त्यासंदर्भात जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी जिल्हा कारागृहाची मागणी केली.रायगड जिल्ह्यात गुन्हेगारीत सतत वाढ होत असताना पकडलेले गुन्हेगार ठेवायचे कुठे असा प्रश्न जिल्हा कारागृह अधीक्षकांना पडला आहे. सध्या तीनशे वर्षांपूर्वीच्या आंग्रे कालीन हिराकोट किल्ल्यात शिक्षा झालेले गुन्हेगार ठेवले जात असून येथील जागा खूपच अपुरी पडत आहे. या जिल्हा कारागृहात दहा खोल्या असून ८० पुरूष कैदी तर दोन महिला कैदी एवढीच कारागृहाची क्षमता आहे, परंतु या कारागृहात सध्या १४६ पुरूष आणि २० महिला कैद्यांना या कारागृहात ठेवण्यात आले आहे. या अतिरिक्त कैद्यांचा ताण कारागृहाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांवर पडत आहे. जिल्हा कारागृहासाठी पर्यायी जागेची मागणी सातत्याने केली जात असून राज्याच्या कारागृह महासंचालक मीरा बोरवणकर यांनी जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांची भेट घेऊन पर्यायी जागेची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.जिल्हा कारागृहातून कैदी पळून जाण्याच्या घटना वाढत असताना एकाच ठिकाणी अनेक कैदी असल्याने आपआपसात हल्ले करण्याच्या घटनाही घडत असतात. त्याचबरोबर कैद्यांना अल्प सुविधा पुरविता येत नाही. आधीच अपुरी जागा असल्याने मोर्चे, आंदोलने आदि प्रकरणात ताब्यात घेतलेल्यांना या ठिकाणी ठेवता येत नाही. तात्पुरती कारवाई झालेल्यांना तळोजा येथील कारागृहात पाठविण्यात येते मात्र तळोजा कारागृहातून आरोपींना सुनावणीसाठी अलिबाग येथील न्यायालयात आणावे लगते. त्यावेळी आरोपींच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर येतो. (वार्ताहर)