मुंबई : राज्याच्या एसटी महामंडळात २०१२ मध्ये एमकेसीएल संस्थेतर्फे भरती झालेल्या ७२७ एसटी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा बदलीसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनात कोकणात नेमणूक झालेल्या चालकांनी उपोषण करत जिल्हा बदलीची मागणी केली.एसटी महामंडळात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी ज्या विभागासाठी अर्ज केला असेल, तेथेच नेमणूक देण्याची पद्धत आहे. मात्र २०१३ मध्ये महामंडळाच्या संचालक मंडळाने ठराव करून राज्यातील विविध विभागांत भरती झालेल्या ७२७ चालकांची मुंबई प्रदेशात म्हणजेच कोकणात नेमणूक करण्यात आली. त्यामुळे चालकांनी सरकारविरोधात दोन वेळा आंदोलने केली. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून चालकांच्या बदल्या भरती झालेल्या मूळ विभागात करण्याचे आश्वासन दिले. संबंधित विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी जिल्हा बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले.शासकीय अधिकारी या आदेशाची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. बरगे म्हणाले की, बैठक झाल्यानंतर सहा महिने उलटले असून एकाही कर्मचाऱ्याची जिल्हा बदली झालेली नाही. त्यामुळे चालकांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. (प्रतिनिधी)
जिल्हा बदलीसाठी एसटी चालकांचे उपोषण
By admin | Published: March 23, 2016 2:59 AM