परतीच्या प्रवासातही विघ्न; मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी, रेल्वेही कासवगतीने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 09:36 AM2023-09-25T09:36:08+5:302023-09-25T09:37:05+5:30
गणेशभक्तांचे हाल, मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी, रेल्वेही कासवगतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/महाड/वडखळ : विघ्नहर्त्या गणेशाला भावपूर्ण निरोप देऊन चाकरमान्यांनी रविवारी परतीची वाट धरली खरी पण मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेने त्यांची कोंडी केली. महामार्गावर अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे दृश्य होते. एकीकडे हे चित्र असताना गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाड्यांनीही माना टाकल्या होत्या. कासवगतीने चालणाऱ्या विशेष गाड्यांमुळे गणेशभक्त कातावले होते.
गणेशोत्सवाला गावी आलेल्या चाकरमान्यांनी गणेशाचे विसर्जन केल्यानंतर रविवारी परतीचा प्रवास सुरू केला. एकाच वेळी तळकोकणापासून चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांसह आल्याने माणगावपासून महाडपर्यंत प्रचंड मोठी वाहतूककोंडी झाली. तसेच पेण परिसरातही तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहतूककोंडीत चाकरमानी अडकून पडला. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने आणि वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने महामार्गावर सकाळपासून ठिकठिकाणी वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. रात्री उशिरापर्यंत चाकरमानी या कोंडीत अडकले होते.
माणगाव ते वीर चक्का जाम
माणगाव या ठिकाणी या महामार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. रविवारी तर माणगावमध्ये वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. यामुळे माणगावपासून महाड तालुक्यातील वीरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संत गतीने पुढे सरकणाऱ्या वाहनांमध्ये प्रवाशांचा वाहतूक कोंडीने दम कोंडला गेला. महामार्ग वाहतूक विभागाने कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही निष्फळ ठरला.
तरीही कोंडी कायम
माणगावपासून वीरपर्यंत १५ किमी अंतरापर्यंत लागलेल्या रांगांमुळे मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या अनेक वाहनचालकांनी आपली वाहने वळवली. पोलिसांनीही पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक टोल, नांदवीमार्गे माणगाव अशी वळवली. मात्र तरीही कोंडी सुटली नाही. रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.
रेल्वे चार तास लेट
रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या स्पेशल ट्रेन चार तास उशिराने धावत होत्या. खेड स्थानकावरील प्रवाशांना रेल्वेत शिरता आले नाही म्हणून प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली.
कोकण कन्या, गणपती स्पेशल, तुतारी एक्सप्रेस या गाड्या परतीच्या प्रवासावेळी उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गणपती स्पेशल गाड्या ४ तास तर तुतारी एक्स्प्रेस दीड तास उशिराने धावत असल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडी स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी होती. सावंतवाडी स्थानकात बाकी सर्व गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून सुटतात, तुतारी एक्सप्रेस ही एकच गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून सुटते. ट्रेनमध्ये बसायला जागा नसल्याने ट्रेन सुटेपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभे होते, अखेरीस अनेकांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १ कडे मोर्चा वळवल्याने गर्दी आणखी वाढली.
- सागर तळवडेकर, प्रवासी