कुर्ला पूर्वेकडील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:19 AM2019-09-10T01:19:21+5:302019-09-10T01:19:36+5:30
वसंतराव नाईक मार्ग येथून कुर्ला रेल्वे स्थानक व नेहरू नगर एसटी डेपो येथे जाताना वाहनांना मोठ्या खड्डयांचा सामना करावा लागत आहे.
ओमकार गावंड
मुंबई : मागील अनेक दिवस पडणाऱ्या पावसामुळे कुर्ला पूर्वेकडील काही रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वसंतराव नाईक मार्ग, शिवसृष्टी मार्ग, एस.जी. बर्वे मार्ग, स्वस्तिक सिग्नल या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सतत पडणाºया पावसामुळे येथील खड्डयांचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्यांवर दररोज अनेक दुचाकी अपघातग्रस्त होत असल्याने दुचाकीस्वारांसाठी हे रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत.
वसंतराव नाईक मार्ग येथून कुर्ला रेल्वे स्थानक व नेहरू नगर एसटी डेपो येथे जाताना वाहनांना मोठ्या खड्डयांचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर एसटी, बेस्ट बस तसेच रिक्षांचे प्रमाण जास्त असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. शिवसृष्टी मार्ग येथून एसजी बर्वे मार्गावर जाताना मोठे खड्डे पडल्याने बेस्ट बस व रिक्षाचालकांना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. स्वस्तिक सिग्नल येथे देखील खड्डे पडल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
पाऊस थांबल्यावर हे रस्ते अधिक निसरडे बनत असल्याने पादचाºयांना तसेच दुचाकीस्वरांना येथून जीव मुठीत धरून जावे लागत आहे. नेहरू नगर व शिवसृष्टी परिसरात मोठी नागरी वस्ती असल्याने नागरिकांना दररोज या खड्डयांच्या तरसाळा सामोरे जावे लागत आहे. खड्डयांचा आकार मोठा असल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील रस्त्यांची लवकरात दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.