दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला

By Admin | Published: November 3, 2014 12:06 AM2014-11-03T00:06:05+5:302014-11-03T00:06:05+5:30

१ नोव्हेंबरपासून ६ नोव्हेंबरपर्यंत सलग कार्यालयीन सुट्टी व शालेय विद्यार्थ्यांना दीपावली सुट्टीचा हंगाम असल्याने पर्यटनस्थळी फिरण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.

Diveagar beach blossomed by tourists | दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला

दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला

googlenewsNext

अभय पाटील, बोर्ली-पंचतन
१ नोव्हेंबरपासून ६ नोव्हेंबरपर्यंत सलग कार्यालयीन सुट्टी व शालेय विद्यार्थ्यांना दीपावली सुट्टीचा हंगाम असल्याने पर्यटनस्थळी फिरण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्णगणेशाचे दिवेआगर येथे समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केली असून, किनारा पर्यटकांनी फुलून गेला आहे.
दिवेआगर, बोर्ली पंचतन येथील हॉटेल्स, लॉजिंग, घरगुती खानावळ हाऊसफुल्ल झाल्या आहेत. येणारे बहुतांशी पर्यटक हे जेवणासाठी मासे खाण्यावरच भर देत असल्याने मासेमारी व्यवसायही तेजीत आहे. समुद्रामध्ये बोटिंगचा तसेच पॅराग्लायडिंगचाही मोह पर्यटकांना आवरता येत नाही. परंतु समुद्रकिनाऱ्यावर प्रशासनाच्या वतीने रात्रीच्या वेळी लाईट्स तसेच बाथरूम्स, कपडे बदलण्याच्या खोलीची व्यवस्था नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे.
दिवेआगरचा समुद्रकिनारा हा सुरक्षित, सुंदर व सुमारे ३.५ कि.मी. लांबीचा असल्याने येणाऱ्या पर्यटकांना गोवा समुद्रकिनारी असल्याचा आनंद लुटता येतो. सुवर्णगणेश मंदिर बांधकाम संथ गतीने सुरू असून, मंदिर लवकरात लवकर पूर्ण करून सुवर्णगणेशाची मूर्ती लवकरच प्रतिष्ठापना करण्याची मनोकामना मंदिरामध्ये दर्शन घेणाऱ्या भाविक व पर्यटकांचीही असते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये १ ते ६ नोव्हेंबरपर्यंत सलग सुट्ट्यांचा हंगाम व शालेय विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी असल्याने दिवेआगर समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
पुणे, नाशिक, मुंबई, कराड तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरासोबतच विदेशी पर्यटकदेखील समुद्रकिनारी भेट देत आहेत. दिवेआगर गावामध्येच प्राचीन रूपनारायण, सुंदर नारायण, उत्तरेश्वर मंदिर व इतरही ठिकाणी पर्यटक भेट देत असून, शेजारीच असलेल्या देवखोल येथील पांडवकालीन कुसुमेश्वर मंदिरालाही पर्यटक आवर्जून भेट देत आहेत. दिवेआगर येथे जवळपास १५ रिसॉर्ट, अनेक घरगुती खानावळी, लॉजिंग असल्या तरी सध्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत.
दिवेआगरशेजारीच भरडखोल, आदगाव, दिघी ही मच्छीमारी व्यवसाय केंद्रे असल्याने व पर्यटकांकडून मच्छी खाण्याची फरमाईश येत असून मच्छी-राईसप्लेटला जास्त मागणी आहे. पापलेट, सुरमई, कोळंबी, बांगडे याशिवाय खेकड्यांनाही पसंती आहे. यामुळे मासेमारी व्यवसाय तेजीत आहे. विशेष म्हणजे मांसाहारी ताटाची किंमतही फक्त १५० ते २०० रुपये इतकी आहे. ताटामध्ये ताजी मच्छी खाण्यास मिळत असल्याने पर्यटकही दिवेआगरच्या जेवणावर बेहद खूश असल्याचे दिसत आहे. समुद्रामध्ये बोटिंग, वाळूतील गाड्या, पॅराग्लायडिंगची मजा घेत समुद्रामध्ये डुुंबण्याचाही आनंद पर्यटक लुटत आहेत.
मात्र हे पर्यटनस्थळ होऊन १७ वर्षे उलटली तरी समुद्रकिनाऱ्यावर आवश्यक भौतिक सुविधांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. समुद्रकिनारी बाथरूम्स, कपडे बदलण्याची खोली, रात्री लाईटची व्यवस्था नसल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Diveagar beach blossomed by tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.