मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी अर्थसंकल्पातील विविध घोषणांवरून देवेंद्र फणडवीस यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच तुम्ही कधी विधिमंडलाला गुंडाळता, कधी आम्हाला गुंडाळता. तर कधी जनतेला गुंडाळता, चाललंय काय? दुसऱ्याच्या घरी पोरं झाली तर त्याला प्रोत्साहन आम्हीच दिलं असं म्हणाल, असाचिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारकडून सादर केलेला अर्थसंकल्पावर बोलताना म्हणाले की, मनात आले ते आकडे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. शासनाने एकूण २६३६ मेगावॅट क्षमतेचे ३४ प्रकल्प कार्यान्वित केले. तर १०७ मेगावॅट क्षमतेचे लघुजलविद्युतप्रकल्प खासगी माध्यमातून सुरू करण्यात आले. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, जलसंपदा विभागाने आतापर्यंत २६ प्रकल्प उभारून महावितरणला दिले. ६ प्रकल्प स्वत: जलसंपदा विभागातर्फे चालवण्यात येतात. तर दोन प्रकल्प हे खासगी प्रवर्तकांना चालवण्यात दिले आहेत. यात आश्चर्याची म्हणजे २०२०-२१ मध्ये एकही प्रकल्प कार्यान्वित केलेला नाही. यातील एक प्रकल्प १९६२ मधील आहे. तर एक प्रकल्प १९५२ मधील आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधीचा प्रकल्प आम्ही केला, असं ठोकून देण्याचं काम या सरकारकडून करण्यात आले आहे. तुम्ही कधी विधिमंडलाला गुंडाळता, कधी आम्हाला गुंडाळता. तर कधी जनतेला गुंडाळता, चाललंय काय? दुसऱ्याच्या घरी पोरं झाली तर त्याला प्रोत्साहन आम्हीच दिलं असं म्हणाल. मद्याच्या संदर्भातील जीआर काढणाऱ्यांना भाषणं देण्याचं काम करतात काय, असं आता मला वाटू लागलंय, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
यावेळी, अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या कृषि कर्जमाफीवरूनही फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली. सरकारमुळे शेतकऱ्यांवर पंचत्वात विलीन होण्याची वेळ आली आहे. कर्जमाफीनंतरही राज्यात खासगी सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील १८ लाख ५२ हजार शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत, अशी माहितीही देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.