धनगर आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाचे विभाजन करा-हरिभाऊ राठोड

By admin | Published: April 10, 2016 03:04 AM2016-04-10T03:04:12+5:302016-04-10T03:04:12+5:30

धनगरांना आरक्षण मिळणे शक्य नाही. या देशातील न्यायालयेही त्यांना आरक्षण देऊ शकणार नाही, असे ठाम मत व्यक्त करतानाच राज्याचे मुख्यमंत्री मात्र धनगरांना आरक्षणाचे आश्वासन देऊन

Divide OBC reservation for Dhangar reservation-Haribhau Rathod | धनगर आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाचे विभाजन करा-हरिभाऊ राठोड

धनगर आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाचे विभाजन करा-हरिभाऊ राठोड

Next

ठाणे : धनगरांना आरक्षण मिळणे शक्य नाही. या देशातील न्यायालयेही त्यांना आरक्षण देऊ शकणार नाही, असे ठाम मत व्यक्त करतानाच राज्याचे मुख्यमंत्री मात्र धनगरांना आरक्षणाचे आश्वासन देऊन वेळकाढूपणा करीत आहेत. त्यामुळे धनगरांना आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षण कोट्याचे विभाजन करावेच लागेल, असे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
राज्यात विविध समाजांना आरक्षण मिळवून देण्यासाठी विविध पक्षांचे कार्यक्रम सुरू आहेत. धरणे-आंदोलने घेतली जात आहेत. मात्र, त्यांना आरक्षण मिळणे शक्य नाही. असे असताना पक्ष नेत्यांनी समाजाची अशी फसवणूक करू नये. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा याबाबत वेळकाढूपणा करू नये. सत्य काय आहे ते जनतेला सांगून टाकावे, असे आवाहन त्यांनी केले. घटनेनुसार ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळत आहे. या आरक्षणाची वर्गवारी करावी. ओबीसी आरक्षणाची ३ वर्गांत विभागणी करून प्रत्येकाला ९ टक्के आरक्षण द्यावे. ज्याचा फायदा बंजारा समाजासारख्या दुर्लक्षित घटकापर्यंत पोहोचेल. धनगर समाजालाही याचा वाटा मिळेल. राज्यासमोर हा एकच पर्याय असल्याने त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘भारतमाता की जय’बाबत ते म्हणाले की, आधी या देशातल्या पीडितवर्गाच्या पोटात दोन वेळेचे जेवण घाला. त्यांना मुख्य प्रवाहात आणा, शिक्षणाची दारे उघडी करून त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण द्या, हे जर तुम्ही देऊ शकत नसाल; तर अशी ढोंगबाजी कशाला करता? भारतमाता की जय या वादंगापेक्षा पोटाची लढाई, सामाजिक समतेची लढाई महत्त्वाची वाटते. हे जर आपण त्यांना देऊ शकलो तर त्या घोषणेला महत्त्व आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, येत्या १५ एप्रिल रोजी पोहरादेवी, जिल्हा वाशिम या ठिकाणी भव्य शोभायात्रा निघणार आहे. यात्रेकरूंना थांबण्यासाठी भक्त निवासाची उभारणी केली आहे. त्या वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे मंत्री रणजित पाटील, संजय राठोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Divide OBC reservation for Dhangar reservation-Haribhau Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.