Join us

‘संविधान’ला दिव्यांगांचा घेराव

By admin | Published: April 24, 2017 2:42 AM

केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वांद्रे येथील ‘संविधान’ निवासस्थानाला कर्णबधिर तरुण-तरुणींनी

मुंबई : केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वांद्रे येथील ‘संविधान’ निवासस्थानाला कर्णबधिर तरुण-तरुणींनी घेराव घातला. त्यांची व्यथा ऐकून घेत आठवले यांनी दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले.दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी मनुष्यबळ विकास, शैक्षणिक कार्यक्रम, रोजगार, चिकित्सा आणि उपचारात्मक सेवेसह संशोधनाचे काम करण्यासाठी वांद्रे येथे अली यावर जंग इन्स्टिट्यूट फॉर हेअरिंग अ‍ॅण्ड स्पीच डिसेबिलिटी या राष्ट्रीय संस्थेची स्थापना झालेली आहे. मात्र संस्थेकडून बहुतेक दिव्यांगांच्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनाही दिव्यांगांपर्यंत पोहोचत नसून यासंदर्भात आठवले यांना माहिती देण्यासाठी घेराव आंदोलन केल्याची माहिती इंडिया डेफ सोसायटीचे सचिव विपुल शहा यांनी दिली.भारतीय दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष प्रसाद साळवी म्हणाले की, अली यावर जंग या संस्थेमध्ये सुमारे २२० कायमस्वरूपी कामगार आणि १२० कंत्राटी पद्धतीने काम करणारे कामगार आहेत. मात्र यांमध्ये हाताच्या बोटावर मोजणारे कामगार हे कर्णबधिर असतील. त्यामुळे कर्णबधिरांना प्रशिक्षण देणे, रोजगार देण्याची मागणी संघटनेने केली आहे.