मुंबई :मुंबई दक्षिण मतदारसंघात यंदा मविआ-महायुतीची लढत ही प्रतिष्ठेची समजली जाते. निवडणूक जाहीर होताच मविआतील उद्धवसेनेने या मतदारसंघात पुन्हा एकदा अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महायुतीच्या उमेदवारीचा प्रश्न सुटलेला नाही. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी पक्षही उमेदवार देणार असे बोलले जात आहे. यापूर्वी मनसेचा महायुतीला मिळालेल्या पाठिंब्यामुळे आणि वंचितच्या उमेदवारामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मतांच्या विभाजनाची शक्यता नाकारता येत नाही.
मतदारसंघातील मुस्लिम समुदायाच्या मतदारांच्या विभाजनाचे मोठे आव्हान उद्धवसेनेसमोर असेल. त्यामुळे मुंबईतील निवडणुकीचा टप्पा तोंडावर आलेला असताना या मतदारसंघातील मुस्लिम बहुल परिसरात दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरविणार आहेत.
तीन-चार दिवसांत अंतिम निर्णय होणार-
मुंबई दक्षिण मतदारसंघासाठी पक्षाकडे काही व्यक्ती उमेदवारीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील योग्य उमेदवाराच्या नावावर येत्या तीन-चार दिवसांत शिक्कामोर्तब करण्यात येईल. - सिद्धार्थ मोकळे, मुख्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी