Join us

आमिर खान-किरण रावचा घटस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:04 AM

१५ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णयलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असलेला आमिर खान ...

१५ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असलेला आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव तब्बल १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर वेगळे झाले आहेत. एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेत असल्याचे त्या दोघांनी अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

आमिर-किरण म्हणतात, ‘१५ वर्षांच्या सुखी संसारात आम्ही हसतखेळत प्रत्येक क्षण आनंदात घालवला. केवळ आदर, विश्वास आणि प्रेमाच्या बळावर आमचे नाते फुलत गेले. काही दिवसांपूर्वी आम्ही नियोजनपूर्वक वेगळे होण्याची तयारी सुरू केली होती. त्याला आज औपचारिक स्वरूप मिळाले. आता आम्ही आयुष्याचा नवा अध्याय सुरू करीत आहोत. यापुढे आम्ही पती-पत्नी नसून, केवळ आमच्या मुलाचे पालक असणार आहोत. आझादचा उत्तम सांभाळ करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.’

आमच्या नात्यातील या निर्णयाला सातत्याने पाठिंबा देणारे आमचे कुटुंबीय आणि मित्रांना धन्यवाद. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही कोणत्याही मतभेदांविना या निर्णयापर्यंत पोहोचलो नसतो. आमच्या शुभचिंतकांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळण्याची आशा आहे. या घटस्फोटाकडे शेवट नव्हे तर नव्या प्रवासाची सुरुवात म्हणून पहाल, अशी आशा असल्याचे दोघांनीही आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पहिले लग्न

आमिर आणि रिना दत्ता १८ एप्रिल १९८६ रोजी विवाहबंधनात अडकले. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना त्यांचे सूर जुळले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही कारणास्तव त्यांनी २००२ मध्ये घटस्फोट घेतला. रिना आणि आमिरला जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. ती आई रिनासोबत राहतात.

दुसरे लग्न

आमिरने २८ डिसेंबर २००५ रोजी किरण रावशी दुसरे लग्न केले. त्या दोघांची भेट ‘लगान’ सिनेमाच्या चित्रीकरणस्थळी झाली. किरण या चित्रपटाची सहायक दिग्दर्शक होती. ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगा असून, तो १० वर्षांचा आहे.

......

पाणी फाउंडेशनसाठी सदैव सोबत

पाणी फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यात आम्ही सोबत असणार असल्याचे आमिर आणि किरणने स्पष्ट केले आहे. दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी या दोघांनी ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून महत्त्वपूर्ण काम केले आहे. केंद्र आणि राज्य शासनाने त्यांची वेळोवेळी दखल घेतली आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या रूपाने त्यांनी नवसंजीवनी आणली. उजाड माळरानावर हिरवे नंदनवन फुलवण्याची किमया त्यांनी साधली. यापुढेही पाणी फाउंडेशनसाठी सोबत काम करू. शिवाय चित्रपट आणि इतर प्रकल्पांमध्येही सहकारी म्हणून काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.