रीतसर घटस्फोटाआधीच मुलीला फॅमिली पेन्शन, हायकोर्टाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 04:11 AM2018-04-06T04:11:30+5:302018-04-06T04:11:30+5:30
रेल्वेत नोकरी करणाऱ्या वडिलांचे आणि नंतर आईचे निधन होण्यापूर्वी जिचा रीतसर घटस्फोट झाला नव्हता अशी विवाहित मुलगीही वडिलांच्या कुटुंबाची सदस्य आहे असे मानून तिला कुटुंब निवृत्तीवेतन द्यावे,
- विशेष प्रतिनिधी
मुंबई - रेल्वेत नोकरी करणाऱ्या वडिलांचे आणि नंतर आईचे निधन होण्यापूर्वी जिचा रीतसर घटस्फोट झाला नव्हता अशी विवाहित मुलगीही वडिलांच्या कुटुंबाची सदस्य आहे असे मानून तिला कुटुंब निवृत्तीवेतन द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मध्य रेल्वे प्रशासनास दिला आहे.
रेल्वेच्या पेन्शन नियमांत दिवंगत कर्मचाºयाच्या घटस्फोटित मुलीला कुटुंब निवृत्तीवेतन देण्याची तरतूद आहे. मात्र वडिलांच्या मृत्यूच्या वेळी जिचा कायदेशीर घटस्फोट झालेला नव्हता, परंतु जी पतीला सोडून माहेरी राहात होती अशी मुलगीही कुटुंबाची सदस्य ठरते का, या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने दिलेला हा पहिलाच निकाल आहे.
न्या. बी. पी. धर्माधि कारी व न्या. अरुण उपाध्ये यांच्या नागपूर येथील खंडपीठाने दिलेल्या या निकालामुळे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील रेल्वे क्वार्टर्समध्ये राहणाºया उषा एकनाथ पाटील या ६० वर्षाच्या महिलेस न्याय मिळाला आहे. यामुळे उषा यांना डिसेंबर १९९९पासूनचे वडिलांचे कुटुंब निवृत्तीवेतन मिळेल. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) उषा यांना पेन्शन देण्याचा आदेश नोव्हेंबर २०१५ मध्ये दिला होता व सप्टेंबर २०१६मध्ये त्यावर शिक्कामोर्तब केले होते. याविरुद्ध रेल्वे प्रशासनाने केलेली रिट याचिका खंडपीठाने फेटाळली. या सुनावणीत रेल्वेसाठी अॅड. एन. पी. लांबट तर उषा यांच्यासाठी अॅड. ए. बी. बंबाळ यांनी काम पाहिले.
वादाचा मुद्दा काय होता?
- उषा यांचे वडील रेल्वेत नोकरीला होते व त्यांचे १६ फेब्रुवारी १९८२ रोजी निधन झाले.
- एकनाथ यांची पत्नी व उषा यांची आई वत्सला यांचे २८ डिसेंबर १९९९ रोजी निधन झाले.
- उषा यांचे १९७९ मध्ये लग्न झाले. पण पंचायतीसमोर पतीपासून पारंपरिक फारकत घेऊन त्या २७ जुलै १९९२ पासून माहेरी येऊन आईसोबत राहू लागल्या.
- जळगाव दिवाणी न्यायालयाकडून त्यांनी २९ नोव्हेंबर २०१० रोजी रीतसर कायदेशीर घटस्फोट मिळविला.
- रेल्वेचे म्हणणे असे होते की, वत्सला यांचे निधन होण्यापूर्वी उषा यांचा रीतसर घटस्फोट झाला नव्हता त्यामुळे ‘घटस्फोटित मुलगी’ या नात्याने त्या दिवंगत कर्मचाºयाच्या कुटुंबाच्या सदस्य ठरत नाहीत व पेन्शनलाही पात्र ठरत नाहीत.
न्यायालयाने काय म्हटले?
-उषा यांनी पंचायतीसमोर पारंपरिक घटस्फोट घेतला व त्या माहेरी येऊन आईसोबत राहू लागल्या याचे रेल्वे पुराव्यानिशी खंडन करू शकली नाही.
- आईचे निधन झाले तेव्हा उषा यांचा रीतसर घटस्फोट झालेला नव्हता हे खरे असले तरी नंतर झालेल्या कादेशीर घटस्फोटाचा निकाल पाहता त्या आईच्या निधनाच्या आधीपासून पतीला सोडून माहेरी येऊन राहिल्या होत्या हे सिद्ध होते.
- आम्ही १८ वर्षांपासून वेगळे राहात आहोत असे उषा व त्यांच्या पतीने एकत्रितपणे लिहून दिल्याने दिवाणी न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला होता. त्यामुळे औपचारिक घटस्फोट होण्याच्या फार आधीपासून त्या पतीला सोडून माहेरी येऊन राहिल्या होत्या हे सिद्ध होते.
- दिवंगत कर्मचाºयाच्या कुटुंबातील निराधार महिला सदस्यास वाºयावर सोडणे हा पेन्शन नियमांचा हेतू नाही. त्यामुळे केवळ औपचारिक घटस्फोट झाला नव्हता अशा तांत्रिक सबबीने दिवंगत कर्मचाºयाच्या, एरवी पात्र असलेल्या, मुलीस पेन्शन नाकारता येणार नाही.