Divorce : ट्रॅफिकमुळे घटस्फोटाची अद्याप एकही तक्रार नाही, त्या विधानाला आधार काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 02:48 PM2022-02-05T14:48:00+5:302022-02-05T14:51:20+5:30
मुंबईत ट्रॅफिकमुळे खरंच घटस्फोट होतात का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या मुंबईतील कोरो या संस्थेशी संपर्क केला.
अल्पेश करकरे
मुंबई : मुंबईतील ट्रॅफिकमुळे दरवर्षी तीन टक्के घटस्फोट होतात असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याची राजकारणातील अनेकांनी खिल्ली उडवली. त्यांच्या या वक्तव्यावर आता महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच, या विधानाला संदर्भ किंवा आधार काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत ट्रॅफिकमुळे खरंच घटस्फोट होतात का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या मुंबईतील कोरो या संस्थेशी संपर्क केला. तसेच, घटस्फोटाची नेमकी कारणं काय असतात हे, जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात बोलताना कोरो संस्थेच्या संभवी महाडिक म्हणाल्या की, "मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे घटस्फोट होतात हे विधान अमृता फडणवीस यांनी कोणत्या आधारे केलं, त्यासंदर्भात त्यांच्याकडे काय माहिती आहे हे अजून अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलेले नाही. परंतु, आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्यामध्ये एकमेकांना वेळ न देण, पैशांची अडचण, कौटुंबिक हिंसाचार, घरातील वाद विवाद, दोघांमध्ये संवाद नसणं, मुलांना न सांभाळणं, एकमेकांना समजून न घेण अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येत असतात. अद्याप आमच्याकडे मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे घटस्फोटाची मागणी करणारी कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही.", असेही महाडिक यांनी म्हटलं.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमृता फडणवीस यांनी आपला वक्तव्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांनी मंकी सर्वे या वेबसाईट सर्वेक्षणाच्या आधारे आपण हे वक्तव्य केल्याचं म्हटलं होतं.