पुणे : खाद्यपदार्थ, स्टेशनरी अशा लहानमोठ्या व्यवसायांसाठी राज्य सरकार दिव्यांग व्यक्तींना सौरऊर्जेवरील फिरती वाहने उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला त्यासाठी पावणेचार लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून, या वर्षी २५ कोटी रुपयांच्या खर्चास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मंजुरी दिली आहे.
दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक-सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी त्यांना हरित ऊर्जेवर चालणारी वाहने उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली होती. त्याअंतर्गत दिव्यांगांना मोबाईल व्हॅन देण्यात येणार आहे. लाभार्थींची निवड करण्यासाठी मुंबईच्या अपंग वित्त व विकास मंहामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात येईल. अपंग वित्त व विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक सदस्य सचिव, तर नागपूरच्या विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक त्याचे सदस्य असतील. या समितीच्या शिफारशीनुसार अर्ज पात्र अथवा अपात्र ठरविण्यात येतील.मोबाईल व्हॅन प्रादेशिक परिवहन विभागाच्या मान्यतेनेच देण्यात येतील. व्हॅनचा पुरवठा केल्यानंतर पुढील एका वर्षासाठी वाहनाची देखभाल-दुरुस्ती निवड केलेल्या पुरवठाधारक करेल. दिव्यांगांच्या अपंगत्वानुसार वाहनाच्या रचनेतदेखील बदल करून दिला जाणार आहे.