मुंबई : आईचे निधन कर्करोगाने झाल्यामुळे दिव्यांग हेमंत मिश्रा हे गेल्या २० वर्षांपासून दरवर्षी प्रत्येक महिन्याला मुख्यमंत्री, महापौर निधीस अनुक्रमे १०० ते ५० रूपयांची मदत करत आहेत. या पैशातून गरिब रुग्णांना आधार मिळत असल्याचे समाधान मिश्रा यांना असून, हीच खरी मानवता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अंधेरी येथील विरा देसाई रोडवर वास्तव्यास असलेले हेमंत मिश्रा हे दिव्यांग आहेत. मिश्रा हे टेलिफोन बुथ चालवितात. टेलिफोन बुथ चालवून जी काही कमाई येते त्यातील काही हिस्सा म्हणजे ५० ते १०० रुपये मुख्यमंत्री आणि महापौर निधीला मिश्रा दान म्हणून महिन्याला देतात. माझ्या आई वडिलांमुळे मला दान करण्याची प्रेरणा मिळाली, असे मिश्रा सांगतात. महत्त्वाचे म्हणजे गेल्या २० वर्षांपासून मिश्रा महापौर निधीला दान देत आहेत. मला हे पैसे दान करताना समाधान मिळते. कारण माझ्या पैशातून गरिबांवर उपचार केले जातात; याचे समाधान मला मिळत असल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे.
माझ्या आईला १९९४ साली कर्करोग झाला होता. यातच त्यांचे निधन झाले. तेव्हापासूनच मी ठरविले की, रुग्णांना मदत केली पाहिजे. मुख्यमंत्री आणि महापौरांकडून देखील याची दखल घेतली जाते. आणि मिश्रा यांचे कौतुक केले जाते. आणि जे लोक इतरांना मदत करतात; असे लोक एका अर्थाने परमेश्वराचे रुप असून, या मार्गाने पुढे जाणे म्हणजेच मानवता आहे, असेही मिश्रा यांना वाटते.