Join us

दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीमधून मिळणार अकरावी प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:07 AM

शालेय शिक्षण विभाग;कर्णबधीर मुलांप्रमाणे मिळणार सवलतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्णबधिर व इतर एटीकेटी विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग ...

शालेय शिक्षण विभाग; कर्णबधीर मुलांप्रमाणे मिळणार सवलत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कर्णबधिर व इतर एटीकेटी विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थ्यांनाही अकरावीचा प्रवेश सुलभ होणार आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांप्रमाणेच अंशतः अंध, पूर्णतः अंध, गतिमंद, अस्थिव्यंग, बहुविकलांग, अध्ययन अक्षम, स्वमग्न, सेरेबल पाल्सी अशा विविध आजाराने ग्रासलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या सवलतींद्वारे अकरावी प्रवेशाची सुविधा आणि दहावीत इंग्रजी विषय स्वतंत्रपणे घेऊन उत्तीर्ण होण्याच्या निर्णयाला शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव, संचालक यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अकरावी प्रवेशासाठी इंग्रजी विषयासह किमान ५ विषयांत उत्तीर्ण होणे नियमांप्रमाणे आवश्यक आहे; मात्र या आधी विद्यार्थ्यांना दोन भाषा व चार ऐच्छिक विषय किंवा सहा विषयांऐवजी एक भाषा व ५ ऐच्छिक विषय घेण्याची परवानगी देण्यात आली होती. इंग्रजी हा विषय घेऊनच विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यास तो अकरावी प्रवेशास पात्र होत असल्याने या विद्यार्थ्यांसाठी अकरावी व पुढील शिक्षणाची दारे आपोआपाच बंद होत होती; मात्र या निर्णयामुळे आता कर्णबधिर तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पुढील मार्ग मोकळा झाला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अकरावीची आणखी एक फेरी राबविण्यात येणार का, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.

....................