मुंबई : दिवाळीदरम्यान फटक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ नोंदविण्यात येत असतानाच लक्ष्मी पूजनच्या दिवशी मुंबईतआगीच्या १५ घटना घडल्याचे कॉल मुंबई अग्निशमन दलास आले, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली. दरवर्षी अशा घटना घडण्याचे सरासरी हे प्रमाण १५० ते २०० आहे. मात्र यावेळी झालेल्या जनजागृतीसह मुंबई अग्निशमन दल वेगाने कार्यरत असल्याने अशा घटनांवर लवकर नियंत्रण मिळविले जात आहे. शिवाय सुदैवाने अशा घटनाही कमी घडत आहेत; ही चांगली बाब आहे, असे दलाचे म्हणणे आहे.
दुसरीकडे यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करून साजरी करायची आहे. यावर्षी कोरोनामुळे बऱ्याच कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून, आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करून यावर्षीची दिवाळी आपण साजरी करूया, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून या काळात कोरोना आणि प्रदूषण वाढणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा सण. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद,उत्साह,समृद्धी व उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शुभेच्छा पेडणेकर यांनी नागरिकांना दिल्या आहेत.