ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणा-या या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी आज बाजारपेठेत गर्दी उसळणार. आजच्या दिवशी बलिपूजनला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बलि आणि त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. या दिवसापासून विक्रमसंवत्सराला प्रारंभ होतो. व्यापा-यांच्या नव्या वर्षालाही याच दिवशी सुरुवात होते. अभ्यंगस्नानानंतर या दिवशी स्त्रिया पतीला औक्षण करण्याचेही महत्त्व आहे.
इतिहास
असूरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील प्रजादक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाला हरवण्यासाठी भगवान विष्णूंची निवड करण्यात आली. बळीराजाने एक यज्ञ केले, या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजासमोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.
वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली, तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रुप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्ती बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे.
बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन का करावे?
या दिवशी बलीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याला नैवेद्य दाखवला जातो; म्हणजेच त्याच्या क्षुधा-तृष्णा शांत केल्या जातात. त्यानंतर वर्षभर बलीराजाने आपल्या काळ्या शक्तीच्या बळावर पृथ्वीवरील जिवांना त्रास न देता इतर वाईट शक्तींना शांत, म्हणजेच आपल्या ताब्यात ठेवून त्यांना दिलेल्या पाताळाच्या राज्यातच गुण्यागोविंदाने नांदावे, हा त्याच्या प्रतिमेच्या पूजेमागील पूजकाचा भाव असतो.
सण साजरा करण्याची परंपरा
बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.