Diwali 2018 : दिवाळीत या भेटवस्तू ठरू शकतात खास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 04:41 AM2018-11-06T04:41:47+5:302018-11-06T04:42:02+5:30

सण उत्सवात भेट देण्याची परंपरा आहे. मित्रपरिवार, नातेवाईकांना भेटवस्तू देताना काय द्यावे याबाबत अनेकदा विचार पडतो. मात्र सध्या मार्केटमध्ये आधुनिक पारंपरिकतेचा मेळ घातलेल्या विविध वस्तू उपलब्ध आहेत.

Diwali 2018: Special gifts that can happen in this Diwali | Diwali 2018 : दिवाळीत या भेटवस्तू ठरू शकतात खास

Diwali 2018 : दिवाळीत या भेटवस्तू ठरू शकतात खास

googlenewsNext

- रीना चव्हाण

आपल्याकडे प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खासकरून दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा सण असल्याने सगळ्यांचे आयुष्य असेच प्रकाशमान होऊन आनंदीआनंद त्यांच्या जीवनात यावा असे वाटते. त्यामुळेच नातेवाइकांना भेटून शुभेच्छा देण्याबरोबर त्यांच्यासाठी खास उपहार या निमित्ताने दिले जातात. आपणही या दिवाळी सणानिमित्त कोणकोणते खास उपहार देता येतील याबाबत जाणून घेऊ या.

चॉकलेट
चॉकलेट म्हटले की लहानच काय तर मोठ्यांच्या तोंडालाही पाणी सुटते. दिवाळीनिमित्त मार्केटमध्ये विविध प्रकारचे चॉकलेट सहज मिळतात. गेल्या काही वर्षात गिफ्ट म्हणून चॉकलेट मोठ्या प्रमाणात दिले जात असल्याने चॉकलेटचे आकर्षक बॉक्स मार्केटमध्ये सहज मिळतात. भेट म्हणून देण्यासाठी हासुद्धा एक चांगला पर्याय आहे.

नाणे
तुमच्या जवळच्या व खास व्यक्तीचा हा सण आठवणीत राहावा असे वाटत असेल तर तुम्ही सोन्याचे नाहीतर चांदीचे नाणे गिफ्ट म्हणून देऊ शकता. नक्कीच तुमचे हे गिफ्ट समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करेल.

आऊटफिट्स
आपल्या लोकांच्या आवडी-निवडीचा विचार करता तुम्ही कपडेही गिफ्ट देऊ शकतात. सणानिमित्त मॉल, मार्केटमध्ये आऊटफिट्सवर आॅफर तसेच बरीच व्हेरायटी बघायला मिळते. साड्या, टॉप, ड्रेसपासून पारंपरिक कपड्यांमध्येही वेगळेपण जाणवते.

मिठाई
दिवाळी म्हणजे मिठाई असे जणू समीकरणच झाले आहे. त्यामुळे खास सण-उत्सावानिमित्त मिठाईच्या दुकानातही आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. जो-तो खास भेट म्हणून मिठाईलाच प्रथम प्राधान्य देताना दिसतो.

 क्रॉकरी
डिनर सेट, टी सेट, बाउल सेट भेट म्हणून देता येतील. मार्केटमध्ये क्रॉकरीचे वेगवेगळे प्रकार सहज मिळतात. काचेबरोबरच स्टील, तांबा, पितळेचे सेटही उपहार म्हणून छान वाटतात.

डेकोरेटिव्ह गिफ्ट
कँडल स्टँड, लॅम्प, घड्याळ, हॅगिंग वॉल पिस, वूडन-मेटल शोपीस, पेंटिंग, डिझायनर फ्लॉवर पॉट इ. वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता.

गॅजेट आणि होम मेकर
जवळच्या खास व्यक्तीसाठी मोबाइल, घड्याळ, लॅपटॉप नाहीतर लॅपटॉप बॅगबरोबरच सँडविच मेकर, ज्युसर, मायक्रोवेअर, रोटीमेकर या वस्तू गिफ्ट म्हणून देता येतील.

सुका मेवा
आपल्या लोकांना आरोग्यवर्धक उपहार देण्याचा विचार असेल तर सुका मेवा चांगला पर्याय आहे. त्यामुळे आपल्या आप्तस्वकीयांची दिवाळी हेल्दी व्हावी असे वाटत असेल तर नक्कीच सुका मेवा चांगला पर्याय आहे. आजकाल मार्केटमध्ये छोट्या-मोठ्या बॉक्समध्ये आकर्षक मांडणी केलेला सुका मेवा सहज मिळतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिक्स नाहीतर वेगवेगळे बॉक्सही देऊ शकता.

ज्वेलरी
ज्वेलरी हा तर महिलांचा वीक पॉइंट असतो. त्यामुळे खास व्यक्तीसाठी तुम्ही ज्वेलरीही खरेदी करू शकता. सण-उत्सवानिमित्त खास आॅफरही यानिमित्ताने असतात. त्यामुळे सोने, हिरे नाहीतर चांदीचे नेकलेस, इअरिंग, ब्रेसलेट, बांगड्या गिफ्ट म्हणून देऊ शकता. जर एवढ्या महागातल्या वस्तू घेणे शक्य नसेल तर आर्टिफिशियल ज्वेलरीमध्येही बरेच प्रकार असतात. पारंपरिकतेबरोबर आधुनिकतेचा साजही यामध्ये असल्याने गिफ्ट म्हणून याचा विचार करायला काहीच हरकत नाही.

फटाके
दिवाळी म्हटली की फटाक्यांची आतषबाजी आलीच. पण गेल्या काही वर्षात पर्यावरण संवर्धन, वाढत्या ध्वनिप्रदूषणाबाबत बरीच जनजागृती केलीय जातेय. त्यासाठी मार्केटमध्ये इको फ्रेंडली फटाके उपलब्ध असल्याने तुम्ही कमी आवाजाच्या व ध्वनिप्रदूषण टाळणारे फटाके उपहार म्हणून देऊ शकता.

Web Title: Diwali 2018: Special gifts that can happen in this Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी